एक्सरे स्कॅनरला कंपन्यांचा खो..
By Admin | Updated: September 10, 2014 00:39 IST2014-09-10T00:38:44+5:302014-09-10T00:39:08+5:30
महालक्ष्मी मंदिर सुरक्षा : टेंडर भरण्यात अनुत्साह

एक्सरे स्कॅनरला कंपन्यांचा खो..
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दरवाज्यांवर बॅग्ज एक्सरे स्कॅनर बसविण्याच्या निर्णयाला कंपन्यांच्या अनुत्साहामुळे अद्याप मुहूर्त लागलेला नाही. एक्सरे स्कॅनर भाडे तत्त्वांवर घेण्यासाठी यापूर्वी दोन वेळा देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने यंदा हे स्कॅनर विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. निविदा प्रसिद्ध होऊन आठवडा झाला तरी अद्याप एकाही कंपनीने निविदा भरलेली नाही. त्यामुळे नवरात्रींपर्यंत दरवाज्यांवर एक्सरे स्कॅनर बसतील याबद्दल साशंकता आहे.
अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महालक्ष्मी मंदिराच्या दरवाज्यांवर एक्सरे स्कॅनर बसविण्याचा निर्णय झाला होता. हा स्कॅनर भाडे तत्त्वांवर घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर्षी एक्सरे स्कॅनर आला आहे; मात्र तांत्रिक बिघाड आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा निविदा प्रसिद्ध होऊनही कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही.
या प्रक्रियेला कंटाळून काही दिवसांपूर्वी प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत एक्सरे स्कॅनर विकत घेण्याचा निर्णय झाला. ही निविदा आॅनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केली. पुण्याच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स व मुंबईच्या एसीएच या दोन कंपन्यांनी दूरध्वनीद्वारे देवस्थान समितीशी संपर्क साधून त्याची चौकशी केली असली, तरी अजून निविदा भरलेली नाही. १५ सप्टेंबर ही निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. नवरात्रोत्सव सुरू होण्यास पंधरा दिवस शिल्लक आहे. उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठीच्या भाविकांची संख्या १४ लाखांच्या आसपास असते. त्यामुळे नवरात्रोत्सवापूर्वी एक्सरे स्कॅनर लागणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)