‘भोगावती’मधील नोकर भरतीस खो!
By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-09T22:28:44+5:302015-04-10T00:26:36+5:30
साखर सहसंचालकांचे आदेश : सत्ताधारी गटाच्या समर्थकांचा हिरमोड

‘भोगावती’मधील नोकर भरतीस खो!
भोगावती : येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये, शिवाय असा भरतीचा विषय असल्यास त्वरित थांबवावा, असा आदेश कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांना दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या समर्थकांत आणि नोकरीच्या आशेवर बसलेल्या तरुणांचा हिरमोड झाला आहे.साखर संचालक कार्यालयास ४ एप्रिलला प्राप्त झालेल्या निवेदनात निवेदनकर्त्यांनी त्यांचा हक्क डावलून कारखान्यात नोकर भरतीचा घाट घातल्याचे म्हटले आहे. ही संभाव्य नोकर भरती थांबविण्याची मागणी केली आहे. भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची कार्यवाही सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपाची, कोणत्याही संवर्गात कायमस्वरूपी, अंशकालीन अथवा रोजंदारी स्वरूपाची भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत.
कारखान्याच्या संभाव्य नोकर भरतीविरुद्ध बळवंत शामराव बरगे (बरगेवाडी, ता. राधानगरी) यांनी सातत्याने विरोध केला आहे. आपला हक्क डावलून नोकर भरती केली जात असल्याच्या कारणावरून बरगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेल्या आदेशाने बरगे यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)
संचालकांच्या बैठकीत चर्चा : पाटील
भोगावती साखर कारखान्यात कोणत्याही स्वरूपाची नोकर भरती करण्याबाबत या अगोदर संचालक मंडळाच्या बैठकीत विषय आलेला नाही. संभाव्य भरतीबाबत निवेदनावरून साखर सहसंचालकांनी कारखान्याला नोकर भरती करू नये म्हणून पत्र दिले आहे. हे पत्र संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चेला घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांनी दिली.