‘सीपीआर’मध्ये सामान्यांची लूट
By Admin | Updated: December 21, 2015 00:34 IST2015-12-21T00:19:26+5:302015-12-21T00:34:37+5:30
कांगावा : औषध विकत आणण्यास पाडले भाग

‘सीपीआर’मध्ये सामान्यांची लूट
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जातात; पण औषधांचा मुबलक स्टॉक उपलब्ध असूनही कुत्रे चावलेल्या शाळकरी मुलावर औषधोपचारासाठीचे रॅबीजचे इंजेक्शन (लस) संबंधित विभागातील डॉक्टरांनी संपल्याचे सांगून खासगी औषध दुकानातून आणायला लावण्याचा प्रकार रविवारी घडला.
सीपीआरमध्ये रॅबीजच्या इंजेक्शनचा कोटा शिल्लक असल्याचे पितळ प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी उघडे पाडून सामान्य लोकांची या रुग्णालयात कशा पद्धतीने लूट व फसवणूक होते, हे उघडकीस आणले. ही घटना रविवारी सायंकाळी सीपीआर रुग्णालयात घडली. कुत्रे चावल्यानंतर संबंधित रुग्णाला रॅबीजचे इंजेक्शन (लस) तातडीने देणे गरजेचे असते. हे इंजेक्शन सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपलब्ध करून देण्यात येते. रविवारी सायंकाळी कसबा बावडा येथील दीपक काटे (वय १५) या मुलास कुत्रे चावल्याने त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले; पण डॉक्टरांनी रॅबीजचे इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगून ते सीपीआर आवारातील मेडिकल दुकानातून खरेदी करावे, असे सांगून औषधांची चिठ्ठी लिहून दिली. काटे याच्या नातेवाइकांनी आवारातील जीवनधारा मेडिकल स्टोअर्समधून ही इंजेक्शने एकूण १२०० रुपयांना विकत घेतली. दरम्यान, येथे प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई तेथे पोहोचले. त्यांनी सीपीआरमधील औषध विभागप्रमुख पी. डी. पाटील यांच्याकडे रॅबीज इंजेक्शनबाबत चौकशी केली असता ते स्टॉकमध्ये असल्याचे सांगितले; पण त्यानंतर देसाई यांनी वॉर्डप्रमुखांकडे फोनवर चौकशी केली असता ते तातडीने तेथे आले. त्यावेळी वॉर्डप्रमुख व देसाई यांनी वॉर्डातील औषध स्टॉकची व स्टॉक रजिस्टरची
तपासणी केली असता दहा रॅबीजची इंजेक्शन शिल्लक असल्याचे आढळले.
सीपीआरमध्ये औषधसाठा उपलब्ध असतानाही तो नसल्याचे सांगून परिसरातील खासगी मेडिकल स्टोअर्समधून ती आणण्यास सांगणारी टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून संगनमताने सर्वसामान्यांची लूट व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मला हे सीपीआरमधील पितळ उघडे पाडावे लागले. या प्रकरणी येत्या दोन दिवसांत आपण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना भेटणार आहे.
- दिलीप देसाई,
अध्यक्ष, प्रजासत्ताक संस्था
पितळ उघडे पाडले
हे रुग्णालय सर्वसामान्यांचे मानले जाते; पण तेथे सामान्य लोकांकडून औषधांच्या नावाखाली लूट व फसवणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी वाढत आहेत. या रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही तो नसल्याचे सांगून सामान्य लोकांची फसवणूक व लूट कशा पद्धतीने होते, हे दिलीप देसाई यांनी उघडकीस आणले. त्यामुळे उपस्थितांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.