कोल्हापूर ‘उत्तर’च्या वारसदाराकडे साऱ्यांच्या नजरा
By Admin | Updated: August 13, 2014 00:35 IST2014-08-13T00:27:10+5:302014-08-13T00:35:27+5:30
कॉँग्रेसला पर्याय शोधावा लागणार : शिवसेनेच्या उमेदवाराशी होणार निकराची लढत

कोल्हापूर ‘उत्तर’च्या वारसदाराकडे साऱ्यांच्या नजरा
कोल्हापूर : २००९ सालातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघा भावांची काही मोजक्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी ज्या पद्धतीने फसगत केली गेली याचा अनुभव लक्षात घेऊन छत्रपती घराण्याचे वारसदार असलेल्या युवराज संभाजीराजे छत्रपतींबरोबरच आता मालोजीराजे छत्रपती यांनीही विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट संकेत दिल्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’मधून कॉँग्रेस पक्षाला आता नवीन सक्षम पर्याय शोधावा लागणार हे नक्की झाले आहे.
मालोजींराजेंचा उत्तराधिकारी कोण? हा गेल्या दोन दिवसांतील चर्चेचा प्रमुख विषय बनून गेला असून, त्याची दिवसेंदिवस उत्सुकताही वाढायला लागली आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी लढावे लागणार असल्याने उमेदवार तितकाच सक्षम, लोकप्रिय आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ लागणारा पाहिजे, याची जाणीव कॉँग्रेस पक्ष नेतृत्वाला आहे.
कॉँग्रेस पक्षातील सर्व निर्णय दिल्ली हायकमांड घेत असते. तेथे जे ठरते ते खाली कार्यकर्त्यांनी अंमलात आणायची एक शिस्त पक्षात आहे. कॉँग्रेसमध्ये निष्ठावंतांचा प्राधान्याने विचार केला जातोय, यावरही कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.
शहरात कॉँग्रेसला चांगले वातावरण असताना, महापालिकेच्या माध्यमातून काही चांगली विकासकामे झाली असतानाही मालोजीराजे निवडणूक लढणार नाही म्हणतात. याच्या मागेही काही शल्य दडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने पक्षीय पातळीवर होईल.
राजकारण्याच्या भाषणाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या नामोल्लेखानेच होते. राजकारण्यांनी मागच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने वर्तन केले. आणि ज्या पद्धतीने त्यांची प्रत्येक टप्प्यावर अडवणूक केली ती पाहता छत्रपती घराण्याचे वारसदार सोडाच. सर्वसामान्य नागरिकही ती विसरलेले नाहीत. पण ज्या पद्धतीने दोघा भावांचा पराभव झाला तो निश्चितच धक्कादायक होता. त्यामुळेच कदाचित या दोघांनीही निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
मालोजी स्वत: काही गोष्टी कॉँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळात अजून काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसतर्फे छत्रपती घराण्याची सून आणि कै. दिग्विजय खानविलकर यांची कन्या मधुरिमाराजे यांचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. कारण ही दोन्ही घराणी कॉँग्रेस व राष्ट्रवादीला पाहिजे आहेत.
शेवटी मालोजीराजे यांचा विचार करण्याचा विषय कॉग्रेस पातळीवर थांबला, तर मात्र पक्षनेतृत्वाला नव्या दमाच्या, तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार हे नक्की आहे. कॉँग्रेससमोर दोन तीन पर्यायांतून एका उमेदवाराचा शोध घ्यावाच लागेल. सध्या माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक सत्यजित कदम, नगरसेवक रविकिरण इंगवले, माजी महापौर सागर चव्हाण असे पर्याय आहेत. एकटे प्रल्हाद चव्हाण सोडले, तर सर्वच चेहरे नवीन आणि एकदम फे्रश आहेत. आता या चेहऱ्यांचाही लेखाजोखा पक्षाकडून केला जाऊ शकतो. प्रल्हाद चव्हाण यांच्या वयाचा मुद्दा सोडला, तर ते पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले आहेत. शेवटी मला नाही, तर माझ्या मुलाचा विचार करा, अशी विनंती त्यांच्याकडून होऊ शकते. सत्यजित हे कॉँग्रेसमध्ये अलीकडेच आले असले तरी त्यांच्याकडे युवकांचे संघटन आहे शिवाय नातेसंबंधाने त्यांना खासदार धनंजय महाडिक व आमदार महादेवराव महाडिक यांचे पाठबळ त्यांना असेल.
रविकिरण इंगवले यांनी मु्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर केलेली टीका ही काहीशी डोकेदुखी ठरणार आहे. इंगवले यांच्या उमेदवारीला महाडिक यांचा पाठिंबा किती राहतोय यावरच त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)