कुरूकलीच्या घोडेश्वर मंदिर परिसराचे रूप पालटले
By Admin | Updated: October 16, 2015 00:48 IST2015-10-15T23:32:31+5:302015-10-16T00:48:16+5:30
दसऱ्याच्या यात्रेला मंदिर सुसज्ज्य : एक कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वाकडे

कुरूकलीच्या घोडेश्वर मंदिर परिसराचे रूप पालटले
अनिल पाटील --मुरगूड--पश्चिम महाराष्ट्रातील व सीमाभागातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेले कुरुकली
(ता. कागल) येथील घोडेश्वर मंदिर व परिसरामधील ‘ब’ वर्ग पर्यटन विकास निधीतून तब्बल एक कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वाकडे नेल्याने मंदिराचे व परिसराचे रूपच पालटले आहे. विजया दशमी अर्थात दसऱ्याला होणाऱ्या यात्रेमधील यात्रेकरूंच्या स्वागतासाठी मंदिर सुसज्ज्य झाले आहे. मंदिर परिसराचा झपाट्याने विकास झाल्याने ग्रामस्थ व भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे.कुरुकलीपासून दोन कि.मी. आत डोंगरावर वसलेल्या आणि निर्सगाच्या कुशीत असलेल्या घोडेश्वर मंदिरात शासनाकडून सुरुवीतस ‘क’ वर्गाचा दर्जा व नंतर ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला, ‘ब’ वर्गात समावेश झाल्यानंतर शासनाकडून तब्बल दोन कोटी ८६ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तत्कालीन जलसंपदामंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी या निधीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीही मंदिर विकासासाठी लाखो रुपयांचा निधी दिला होता. त्यामधून पाच लाख रुपये खर्च करून सुसज्य सभागृहाची वास्तू पूर्णत्वास गेली आहे.
अर्थातच ‘ब’ वर्ग पर्यटन स्थळात समावेश झाल्यानंतर परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. ‘क’वर्ग विकास निधीतून यात्री निवास, पालखीच्या मार्गावर पेव्हिंग ब्लॉक, परिसरातील रस्त्यांचे डांबकीरण अशी लाखो रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. ‘ब’ वर्गातील निधीतून परिसरामध्ये महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी स्वतंत्रकक्ष, स्वतंत्र स्वच्छतागृहे, संपूर्ण मंदिर परिसरामध्ये २५ लाख रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक घालण्यात आले आहेत. त्यामुळे पालखीचा मार्ग ही नवीनच झाला आहे. संपूर्ण मंदिरात सभोवताली संरक्षक भिंंतही बांधण्यास सुरुवात होणार आहे. या सर्वांमुळे या परिसराला झळाळी आली आहे.
यावर्षी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या तक्रारी विचारात घेऊन मंदिर प्रशासन व ग्रामस्थ यांच्या नियोजनाने विविध बदल केले आहेत. त्यातील मंदिराला लागून असणारी खेळण्यांची, मिठाईची दुकाने, हॉटेल, पाळणे, आदींना ५०० मीटर दूर जागा मिळणार आहे. परिसरामध्ये जाण्या-येण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब केला जाणार असल्याने वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.
यात्रा कार्यक्रम
मुख्य यात्रा २०, २१, व २२ आक्टोबरला होणार आहे. श्रींची पारंपरिक मुखवटा मिरवणूक २० आॅक्टोबरला कुरूकलीतून मंदिराकडे जाणार आहे. २१ ला श्रींचा जागर व त्याच दिवशी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. गुरूवारी ( दि. २२) दुपारी तीन वाजता हजारो भक्तांच्या समवेत पालखी सोहळा पार पडणार आहे.