‘मिक्सिंग पॉर्इंट’वर जाणकारांची नजर
By Admin | Updated: August 7, 2014 00:24 IST2014-08-07T00:02:41+5:302014-08-07T00:24:01+5:30
पोलीस निरीक्षक नवीन : डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी कसली कंबर

‘मिक्सिंग पॉर्इंट’वर जाणकारांची नजर
एकनाथ पाटील- कोल्हापूर .. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रशासनातील पोलीस अधीक्षकांपासूनचे सगळेच अधिकारी नवीन आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी या संवेदनशील मिरवणुकीची जबाबदारी जाणकार आणि मुरब्बी कॉन्स्टेबलांवर पडणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या गर्दी व मारामारीच्या पार्श्वभूमीवर उमा टॉकीज, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, आदी ‘मिक्सिंग पॉर्इंट’ची पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा येत्या दोन दिवसांत पाहणी करणार आहेत.
गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाही डॉल्बीमुक्त व दारू मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस दलाने उशिरा का होईना कंबर कसली आहे. परंतु यावर्षी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या चार पोलीस ठाण्यांचे प्रमुख नवीनच रूजू झाले आहेत.
त्यामुळे शहरातील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्ती व तरुण मंडळांचे कार्यकर्ते अद्याप नजरेखाली नाहीत. कोण-कोणत्या तालीम व मंडळामध्ये पूर्ववैमनस्य आहे, याचीही बऱ्यापैकी कल्पना नाही. त्यामुळे यंदाची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीची संपूर्ण जबाबदारी जाणकार आणि मुरब्बी पोलीस कॉन्स्टेबलवर येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या गणराया अवॉर्डमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘मिक्सिंग पॉर्इंट’वर कार्यकर्त्यांचे चेहरे ओळखणाऱ्या पोलिसांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्याने जाणकार पोलिसांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. चारही पोलीस ठाण्यांतील अशा जाणकार पोलिसांची यादी बनविण्यात शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे मग्न आहेत.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाचवेळी अनेक गणेश मंडळे एकत्र आल्यानंतर ‘मिक्सिंग पॉर्इंट’ला पोलिसांची तारांबळ उडते. काही मंडळांचे कार्यकर्ते मुख्य मिरवणुकीत आपल्या मनाप्रमाणे प्रवेश मिळविण्याकरिता बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. त्यामुळे मिरवणूक खोळंबून राहण्याचे प्रकार यापूर्वी अनेकवेळा घडले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मिक्सिंग पॉर्इंट’बाबत विशेष खबरदारी म्हणून डॉ. शर्मा येत्या दोन दिवसांत मिरवणूक मार्गांची पाहणी करणार आहेत.
--लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील गणेश मंडळे मुख्य मार्गाकडे किंवा पर्यायी मार्गाकडे वळतात. उमा टॉकीजकडून आलेली गणेश मंडळे तसेच कोळेकर तिकटीमार्गे आलेली शहरातील व करवीर तालुक्यातून आलेली गणेश मंडळे मिरवणुकीत सामील होऊन पुढे बिनखांबी गणेश मंदिराकडे जातात.
--या ठिकाणी अधिकाऱ्यांनी उमा टॉकीजकडून येणारी दहा गणेश मंडळे बिनखांबी गणेश मंदिराकडे सोडल्यानंतर कोळेकर तिकटीकडून येणारी पाच मंडळे मिरवणुकीत सामील करून घेतली जातात. अशावेळी मंडळांची गर्दी होऊन पोलिसांवर ताण पडतो. बिनखांबी गणेश मंदिराकडे येणाऱ्या काही मंडळांचे मिक्सिंग खरी कॉर्नर येथे होते.
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन सुरू आहे. ‘मिक्सिंग पॉर्इंट’बाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक