कोल्हापूर मिरवणूक मार्गावर ५० सीसीटीव्हींची नजर
By Admin | Updated: September 6, 2014 00:41 IST2014-09-06T00:40:05+5:302014-09-06T00:41:16+5:30
घडामोडींवर ‘वॉच’ ठेवणार : चित्रीकरणावरून पोलीस करणार कारवाई

कोल्हापूर मिरवणूक मार्गावर ५० सीसीटीव्हींची नजर
कोल्हापूर : येत्या सोमवारी (दि.८) होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. या कॅमेऱ्यांतील चित्रीकरण पाहून संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीला शिस्त लागण्याची शक्यता आहे. भाडेतत्त्वावरील हे कॅमेरे आज शुक्रवारपासून बसविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवटची मूर्ती विसर्जित होईपर्यंत हे चित्रीकरण करण्यात येणार आहे
विसर्जन मिरवणुकीत मंडळाचा गणेश पुढे नेण्यावरून अथवा मिरजकर तिकटी ते पापाची तिकटीपर्यंत या मुख्य मार्गावर जास्त काळ रेंगाळत राहण्याची प्रमुख मंडळांचा प्रयत्न असतो. त्यांना पोलिसांनी पुढे व्हा म्हटल्यावर लगेच कार्यकर्त्यांना राग येतो व तोच मुद्दा प्रतिष्ठेचा करून पोलिसांशी हुज्जत घातली जाते. पोलिसांनी कारवाई केली तर लगेच धार्मिक मिरवणुकीवर लाठीमार केला म्हणून पोलिसांवर टीकेचे झोड उठवली जाते, असा अनुभव गेल्या काही वर्षांचा आहे. यंदा तर तोंडावर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे इच्छुकांनी मंडळांना वर्गणी देताना हात सैल सोडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या मिरवणुकीत जोरदार ईर्षा होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे एकाचवेळी हद्दपारीची कारवाई व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन पोलिसांनी मिरवणुकीतील हुल्लडबाजीला लगाम घालण्याची व्यवस्था केली आहे.
मंडळांतील वाद, भांडणे, मारामाऱ्या, महिला-मुलींची छेडछाड, मद्यपान करून धिंगाणा करणे, अश्लील हावभाव, हिडीस नृत्य,डॉल्बीचा दणदणाट या सगळ््या घटना मोठ्या क्षमतेच्या एल.ई.डी.वर लोकांना दिसणार आहेत. त्याच चित्रीकरणावरून आक्षेपार्ह वर्तनाबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)
खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा घाट व क्रशर चौक तसेच तीन ठिकाणी कंट्रोल रूम असणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरात संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचे चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.
- दिनकर मोहिते, पोलीस निरीक्षक ,जुना राजवाडा पोलीस ठाणे.