परराज्यातील मजुरांचा लोंढा पुन्हा गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:20+5:302021-04-16T04:25:20+5:30
कोल्हापूर : मोठ्या लाॅकडाऊनच्या भीतीने औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर पुन्हा आपआपल्या गावाकडे परतू लागले आहेत. ...

परराज्यातील मजुरांचा लोंढा पुन्हा गावाकडे
कोल्हापूर : मोठ्या लाॅकडाऊनच्या भीतीने औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे परराज्यातील मजूर पुन्हा आपआपल्या गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे या कामगारांनी आठवड्यातून एकदा शुक्रवारी पहाटे धावणाऱ्या कोल्हापूर-धनबाद या रेल्वेसाठी गुरुवारी सायंकाळी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या रेल्वेसाठी १,२०० जणांनी आगावू आरक्षण केले असून ३०० जण प्रतीक्षा यादीवर आहेत.
कोरोनाच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात १५ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला. लाॅकडाऊन वाढेल या भीतीने कोल्हापुरातील शिरोली, गोकूळ शिरगाव, कागल पंचतारांकित, हातकणंगले आदी औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेशमधील परप्रांतीय कामगार धास्तावले आहेत. त्यामुळे अनेकांनी पुन्हा आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता बिहारमधील गया जिल्ह्यात रवाना होणाऱ्या कोल्हापूर-धनबाद या रेल्वेसाठी गुरुवारी सायंकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. या रेल्वेचे १,२०० जणांचे आगावू आरक्षण झाले असून ३०० जण प्रतीक्षा यादीवर आहेत. लाॅकडाऊन वाढल्यानंतर उद्योगांचे मालक काहीच देणार नाहीत. या भीतीने आम्ही आमच्या गावाकडे परतू लागलो आहाेत. अशी एकच प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडी होती.
व्हाईट आर्मीची अल्पावधीतच मदत
कोल्हापूर-धनबाद (बिहार) एक्सप्रेस मधून आपल्या गावी परतण्यासाठी परराज्यातील मजुरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. याची दखल घेत या प्रवाशांची जेवणाची सोय व्हावी, याकरिता व्हाईट आर्मीच्यावतीने ३५० अन्नांची पाकिटे पुरविण्यात आली.
प्रतिक्रिया
लाॅकडाऊन आणखी वाढल्यानंतर आम्ही जेथे ठेकेदारामार्फत काम करतो. त्यामुळे कंपनीचे मालक कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यापेक्षा आपल्या गावी परत गेल्यास बरे होईल.
- बबलू यादव, परप्रांतीय मजूर, जमू जिल्हा (बिहार)
प्रतिक्रिया
पुढे काम मिळेल की नाही, माहीत नाही. त्यापेक्षा आपल्या गावी काही तरी कामधंदा आणि कुटुंबीयांत जाता येईल.
- बिरंदर यादव, गया (बिहार)
फोटो : १५०४२०२१-कोल-रेल्वे०१, ०२, ०३
ओळी : दीर्घ कालावधीसारख्या लाॅकडाऊनच्या भीतीने विविध औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी गुरुवारी रात्री कोल्हापूर-धनबाद या रेल्वेसाठी गर्दी केली होती.
(छाया : नसीर अत्तार)