पॉलिशच्या बहाण्याने १४ तोळे दागिने लंपास

By Admin | Updated: March 17, 2016 00:49 IST2016-03-17T00:49:41+5:302016-03-17T00:49:54+5:30

इस्लामपुरातील घटना : चोरी होताच महिलेला भोवळ

Lollipop 14 Tola ornaments with the help of polishing | पॉलिशच्या बहाण्याने १४ तोळे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने १४ तोळे दागिने लंपास

इस्लामपूर : शहरातील महादेवनगर परिसरातील व्यापारी उदय देसाई यांच्या घरातून दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या आईच्या अंगावरील १४ तोळ्याचे दागिने लंपास केले. बिलवर, पाटल्या, चेन अशा साडेतीन लाखाच्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.
याबाबत उदय आदिनाथ देसाई (वय ४९, रा. महादेवनगर, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता दुकानात आले. त्यावेळी घरी त्यांची आई व पत्नी होत्या. पावणेअकराच्या सुमारास मिश्र हिंदी भाषेत बोलणाऱ्या दोघांनी घरात प्रवेश करून आम्ही कंपनीचे कर्मचारी आहोत. पॉलिश पावडरचे वितरण करतो आणि सोने पॉलिश करून देतो, असे त्यांनी सांगितले. देसाई यांनी त्यांना दागिने आणून दिले. या पॉलिश पावडरमध्ये पाणी ओतून त्यामध्ये पिवळ्या रंगाची पॉलिशची पावडर टाकून त्या पाण्यात दागिने टाकले. या सगळ्या प्रक्रियेत हातचलाखी करीत या दोघा भामट्यांनी पाण्यातील दागिने चोरून स्वत:कडे घेतले आणि भांडे तेथेच ठेवून पोबारा केला. काही वेळाने श्रीमती देसाई यांना आपल्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समजताच त्या भोवळ येऊन पडल्या.
दागिने, भांडी पॉलिश होतात, तुमच्या अंगावरील दागिने तुमच्यासमोर पॉलिश करून देतो, असे सांगून देसाई यांच्या ७९ वर्षीय वृध्द आईचा त्यांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर देसाई यांनी आपल्याकडील पाच तोळे वजनाच्या ४ बिलवर, ५ तोळे वजनाच्या २ पाटल्या आणि ४ तोळे वजनाची १ चेन असे १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने या भामट्यांकडे दिले. त्यांनी या घटनेची माहिती भाचा आशिष बर्डे याने दुकानात जाऊन उदय देसाई यांना दिली. देसाई यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक
प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, बापू कांबळे यांनी या परिसरातील एका हॉटेलमधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. मात्र, त्यामधून भामट्यांचा माग लागला नाही. (वार्ताहर)

भामट्यांचे रेखाचित्र..!
महादेवनगर परिसरात १४ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या भामट्यांचे वर्णन श्रीमती देसाई यांनी सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित भामट्यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. घटनेतील भामट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

Web Title: Lollipop 14 Tola ornaments with the help of polishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.