लोकसभा युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
By Admin | Updated: March 9, 2015 23:50 IST2015-03-09T23:17:45+5:302015-03-09T23:50:40+5:30
पानसरेंच्या हल्लेखोरांना पकडण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोकसभा युवक काँग्रेसचा मूक मोर्चा
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आठ दिवसांत पकडून त्यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी कोल्हापूर लोकसभा युवक काँग्रेस समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे दोनशेहून अधिक युवक कार्यकर्ते तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सहभागी झाले होते. पानसरे यांच्या हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा भारतीय राज्यघटना विरोधी आहे. केवळ हल्लेखोरांनाच न पकडता त्यामागील शक्ती व संघटनांवरही योग्य तो पायबंद घालावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडले नाही तर तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही मोर्चाच्यावतीने देण्यात आला. युवक काँग्रेसच्या या मूकमोर्चाला स्टेशन रोडवरील काँग्रेस भवनपासून सुरुवात झाली. मोर्चात युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरउन्हातून हा मोर्चा स्टेशन रोड, बसंत-बहार चित्रमंदिरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल वर्धा, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शंभूराजे देसाई, नगरसेवक सत्यजित कदम, विद्याधर गुरबे, विष्णू पाटील, उत्तम आंबवडे, जितेंद्र यशवंत, रुपाली पाटील, योगेश कांबळे, राम पाटील, सरदार पाटील, वैभव तहसीलदार,संदीप पाटील, दीपक थोरात, कृष्णात धोत्रे, अमर देसाई आदींनी केले. मोर्चाच्यावतीने एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)