Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:00 AM2019-04-13T00:00:09+5:302019-04-13T00:00:27+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट ...

Lok Sabha Election 2019 | Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

Lok Sabha Election 2019 जंगी प्रचारांमध्ये यांची उणीवच

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकामुळे निवडणुकीचं वातावरण बदलून जायचं, दुसऱ्याची बोलण्याची खानदानी स्टाईल, तिसरा थेट काळजाला हात घालायचा; चौथा कोणताही आरोप बेधडकपणे करायचा, तर पाचवा बोलताना हसून-हसून मुरकुंड्या वळायच्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचाराचा धुरळा उडाला असताना बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे आणि पतंगराव कदम यांची उणीव नेते, कार्यकर्त्यांना भासत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे जरी वय झाले होते तरी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे त्यांचे शब्द ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आतुर असायचा. गेल्याच लोकसभेच्या आधी त्यांचे निधन झाले; परंतु आजही शिवसेनेच्या सभा होताना त्यांची आठवण निघते.
विलासराव देशमुख यांचेही गेल्या लोकसभेच्या आधी म्हणजेच १४ आॅगस्ट २०१२ रोजी निधन झाले असले तरी आजही कॉँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विद्यमान परिस्थितीमध्ये त्यांची उणीव जाणवते. आपल्या दिलखुलास स्टाईलमध्ये, मान हलवत खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत देशमुख जे बोलायचे, त्याचा प्रभाव पडायचा. हा माणूस बोलायला उभा राहिला की चित्रच डोळ्यांसमोर उभं करायचा. ‘रोजगार हमीवर काम करणाºया पोराला या राज्याचा उपमुख्यमंत्री बनवण्याचं काम केवळ पवारसाहेबच करू शकतात,’ असे आपल्या स्टाईलमध्ये सांगून शाहू, फुले, आंबेडकरांची परंपरा मजबूत करण्यासाठी घड्याळाला मतदान करा, असे सांगणारे आर. आर. पाटील यांची म्हणूनच आज उणीव भासते. त्यांच्या बोलण्यातील सच्चेपणामुळेच कार्यकर्ते त्यांच्यावर फिदा असायचे.
समोरचा विरोधक कितीही मोठा असो; त्याच्याबाबतीत बोलताना भीडभाड न ठेवणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे. आपल्या रांगड्या शैलीमध्ये राज्यातील बहुजन समाजाला आवाहन करणारा हा नेता बोलत असताना ज्या पद्धतीने बोलत असायचा ती पद्धत कार्यकर्त्यांना आवडायची. ३ जून २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. मात्र आजही भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासतच असणार. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील दिलखुलास माणूस म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते ते पतंगराव कदम. त्यांचे निधन ९ मार्च २०१८ रोजी झाले. अन्यथा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सभा घेत, ‘एकमेकांची जिरविण्यामध्ये आमचीच जिरली आहे. आता ही जिरवाजिरवी पुरे झाली,’ असे सांगत पतंगरावांनी निश्चितच कॉँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचे कान टोचले असते यात शंका नाही.
प्रचार शिगेला, चौफेर बोलणाऱ्यांची वानवा
सर्वच पक्षांकडे चौफेर बोलणाºया वक्त्यांची वानवा असल्याचे दिसून येते. जनतेची नस ओळखलेले, आपल्या शैलीने लाखोंच्या सभेला खिळवून ठेवणारे, मुद्द्यांची प्रभावी मांडणी करणारे प्रभावी नेते मोजकेच आहेत. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासतच आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.