Lok Sabha Election 2019 कुळं काढणारे वारसा कशाचा सांगणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:03 IST2019-04-11T01:03:24+5:302019-04-11T01:03:42+5:30
समीर देशपांडे/प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा असे रिंगण आखणारे आणि ...

Lok Sabha Election 2019 कुळं काढणारे वारसा कशाचा सांगणार ?
समीर देशपांडे/प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेतून पैसा असे रिंगण आखणारे आणि कुळं काढणारे वारसा तो काय सांगणार ? असा खडा सवाल शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांना विचारला. बुधवारी त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी ‘लोकमत’ला त्यांनी रोखठोक मुलाखत दिली. या निवडणुकीत कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महाडिक प्रवृत्तीच्या विरोधात असल्यामुळे सर्व मतदारसंघात महाडिक नको असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा दावाही मंडलिक यांनी केला.
केंद्र, राज्य सरकारच्या
कामांचे श्रेय महाडिक घेतात
नरेंद्र मोदी सरकारने शिवसेना-भाजपच्या राज्यातील सरकारसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे यांनी रेल्वे, विमानतळासह कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. निधी आणला. याचे श्रेय विरोधी पक्षात असलेले महाडिक घेतातच कसे? त्यांना हे श्रेय घेण्याचा अधिकारच नाही, असे मंडलिक यांनी निक्षून सांगितले.
महाडिकांसाठीच ‘बास्केट ब्रिज’
खासदार बास्केट ब्रिज मंजूर झाल्याचे सांगतात. परंतु जनतेला तो कधीच दिसला नाही. तो अदृश्य असा पूल आहे. तो केवळ महाडिक आणि त्यांच्या घरातील मंडळींनाच दिसतो, असा टोला मंडलिक यांनी लगावला.
प्रश्न : तीन वेळा ‘संसदरत्न’ झालेल्या उमेदवाराशी आपली लढत आहे. काय सांगाल ?
उत्तर : एका खासगी एजन्सीने दिलेल्या संसदरत्न पुरस्काराचे कौतुक सांगत ते फिरत आहेत; परंतु आता जनतेला अनेक गोष्टी समजल्या आहेत. हे तर महाडिकांच्या घरातीलच ‘संसदरत्न’ आहेत. त्यामुळेच ते स्वत:चे कौतुक करून घेत आहेत.
प्रश्न : त्यांनी केलेली विकासकामे, संपर्क याबद्दल काय म्हणाल ?
उत्तर : ते मतदारसंघातील अनेक गावांत निवडून गेल्यानंतर फिरकलेही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. गावोगावी गेल्यानंतर लोक सांगतात; त्यामुळे निवडून गेल्यानंतर इव्हेंटमध्ये रमलेल्या खासदारांचे मतदारसंघाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
प्रश्न : तुमची उमेदवारी सर्वपक्षीय आहे असे म्हटले जाते. ते कसे ?
उत्तर : मुळात मी शिवसेना-भाजप महायुतीचा उमेदवार आहे; परंतु गेली अनेक वर्षे ज्या पद्धतीने महाडिक कुटुंबाने वेगवेगळ्या पक्षांसह जनतेलाही वेठीस धरले, त्यामुळे जनता आता चिडली आहे. अनेक नेत्यांनाही वास्तव कळून चुकले आहे. केवळ ‘गोकुळ’ ताब्यात ठेवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करायच्या आणि जनतेला आपले गुलाम समजायचे, या वृत्तीला विरोध म्हणून आता काँग्रेससह राष्ट्रवादीची अनेक मंडळी आणि सर्वपक्षीय जनता उघडपणे माझ्या प्रचारामध्ये उतरली आहे.
प्रश्न : ‘महाडिकांना घालवा’ अशी भूमिका घेण्यामागील कारण काय ?
उत्तर : शिवाजी चौकातील गणपतीसमोर महादेवराव महाडिक यांनी धनंजय महाडिक यांचा अश्वमेध सोडला आहे. हिंमत असेल त्यांनी अडवून दाखवावा, असे आव्हान दिले होते. ही भाषा कोल्हापुरात चालत नाही. इथला एक स्वाभिमानी कार्यकर्ता असले १०० घोडे अडवून दाखवेल. त्यामुळेच बाहेरच्यांनी कोल्हापुरात येऊन दिलेले आव्हान जनतेने स्वीकारून निवडणूकच हातात घेतली आहे.
प्रश्न : तुम्ही सायंकाळनंतर आणि सकाळी लवकर ‘नॉट रिचेबल असता’ असा आरोप तुमच्यावर होतो. त्याचे काय ?
उत्तर : मला सकाळी आणि सायंकाळी महाडिकांनी कधी फोन केला होता; परंतु ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ ही महाडिकांची पद्धत आहे. मी प्राध्यापक म्हणून कॉलेजवर काम केले आहे. कोल्हापुरात दुपारी १२ नंतर कुठले कॉलेज सुरू होत नाही. ते असेल तर महाडिक त्याच कॉलेजमध्ये शिकले असतील.
प्रश्न : तुम्ही जिल्हा परिषदेत केवळ ४६ दिवस उपस्थित होता, असा आरोप होतोय.
उत्तर : मुळात जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांसाठी हजेरी पुस्तक नसते. मग यांनी ही नवी माहिती कुठून काढली..? रोज एक ना एक कार्यक्रम जिल्हा परिषदेत असतो. स्थायी, जलव्यवस्थापन, सर्वसाधारण सभांचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो. त्यामुळे हा महाडिकांचा खोटारडेपणा आहे.