जिल्ह्यातील २८ शाळांना कुलूप

By Admin | Updated: February 26, 2016 01:23 IST2016-02-26T01:02:46+5:302016-02-26T01:23:44+5:30

प्रस्ताव शासनाकडे : जूनपासून अंमलबजावणी; शिक्षक अतिरिक्त होणार

Lockup to 28 schools in the district | जिल्ह्यातील २८ शाळांना कुलूप

जिल्ह्यातील २८ शाळांना कुलूप

भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील पाच पटसंख्या असलेल्या २८ द्विशिक्षकी शाळा पहिल्या टप्प्यात बंद होऊन त्यांना कुलूप लागणार आहे. या शाळा बंद झाल्यास ५४ शिक्षक अतिरक्त होणार आहेत. बंद शाळांतील विद्यार्थ्यांच्या मोफत वाहतुकीची सोय करून त्यांना जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने २० पटांखालील ४०७ शाळा बंद करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या एकूण २००५ शाळा आहेत. दरम्यान, नोकरी-व्यवसायानिमित्त शहरातील वास्तव्य, पालकांचा पाल्यास इंग्रजी शाळेत घालण्याचा वाढता कल, जिल्हा परिषदेच्या काही शाळांतील घसरलेली गुणवत्ता, प्राथमिक शिक्षकांचे शिकविण्यापेक्षा राजकारण व अन्य गोष्टींकडे विशेष लक्षामुळे अध्यापनाकडे होणारे दुर्लक्ष, आदी कारणांमुळे पटसंख्या घटते आहे. अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये जात आहेत. यामुळे पटसंख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून एक विद्यार्थी असलेल्या गावांत, वाड्या-वस्त्यांवर द्विशिक्षकी शाळा अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
दुर्गम, डोंगराळसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रत्येक मुलास शिक्षण मिळावे, हा उद्देश असल्यामुळे शाळा सुरू आहेत. प्राथमिक शिक्षण प्रशासनाने घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ४०७ शाळांत २० पटाच्या आत विद्यार्थी आहेत. पाच पटसंख्येच्या आतील २७, दहा पटसंख्येच्या आतील १०२, पंधरा पटासंख्येच्या आतील २७७ शाळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर केल्यानंतर विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपनीयपणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून पाच पटसंख्येच्या आतील शाळांची माहिती घेऊन जूनमध्ये त्या शाळा बंद केल्या जाणार आहेत. वीस पटाखाली शाळाही बंद केल्यास तब्बल आठशे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. बंद होणाऱ्या सर्व शाळा वाड्या-वस्त्यांवरील असल्याने गरीब, सामान्य कुटुंबांतील मुलांना त्याचा फटका बसणार आहे. जवळच्या शाळेत जाण्या-येण्याची सोय केली तरी गावापासून लांब जावे लागणार असल्याचे शल्य पालकांमध्ये आहे.

Web Title: Lockup to 28 schools in the district