पोलिसी बळ झुगारत न्यायालयाला कुलूप
By Admin | Updated: April 12, 2015 00:46 IST2015-04-12T00:46:51+5:302015-04-12T00:46:51+5:30
सर्किट बेंचसाठी आंदोलन : पोलीस-वकीलांत झटापट ; लोक अदालतीच्या कामकाजापासून अलिप्त; वकिल ताब्यात

पोलिसी बळ झुगारत न्यायालयाला कुलूप
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, ही मागणी लावून धरत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीवेळी कोल्हापुरातील वकिलांनी पोलिसांचे बळ झुगारत न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले; पण मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावत असताना पोलीस-वकील यांच्यात झटापट झाली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतल्यानंतर येथील वातावरण निवळले. यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीपासून वकील बांधव कामकाजापासून अलिप्त राहिले, तर पक्षकारांनीही या अदालतीकडे पाठ फिरविली. त्यामुळे हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा वकिलांनी केला.
कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा व सांगली या सहा जिल्ह्णांसाठी उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी दोन दशकांहून काळ अधिक वकिलांचे आंदोलन सुरू आहे. शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीवेळी टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळपासून वकील जमू लागले. यावेळी काही तुरळक पक्षकार येथे आले असता त्यांना लोकअदालतीला जाऊ नका, अशी विनंती वकिलांनी केली. त्याला पक्षकारांनी साथ देत अदालतीकडे पाठ फिरवली.
त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास वकिलांनी दुसऱ्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर सर्व वकील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. यावेळी अॅड. राजेंद्र किंकर यांनी, सर्किट बेंचप्रश्नी भूमिका सर्वांसमोर विशद केली. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यासाठी मोर्चा वळविला. यावेळी उपाध्यक्ष अॅड.के.व्ही. पाटील म्हणाले, आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सुमारे ३५ हजार खटले ठेवण्यात आले आहेत. सर्किट बेंच मागणीसाठी शुक्रवारी (दि. १७) मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आहे. यावेळी प्रवेशद्वाराजवळ आडवे राहून पोलिसांनी कुलूप लावण्यास विरोध दर्शविला. त्यावेळी पोलीस-वकील यांच्यात झटापट झाली. वकील आक्रमक झाल्याने शेवटी पोलिसांनी सर्व वकिलांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसविले व पोलीस ठाण्यात नेले. आंदोलनात सेक्रेटरी अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. अजित मोहिते, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. बी. आर. पाटील, अॅड. राजेंद्र किंकर, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. रवी जानकर, अॅड. अमोल पाटील, अॅड. समीर पाटील, अॅड. राहुल शेळके, अॅड. पूजा कटके, अॅड. चारूलता चव्हाण, अॅड. सुशीला कदम, अॅड. बाबासाहेब पाटील, अॅड. जगदीश आडनाईक, अॅड. बी. एम. शास्त्री, अॅड. राजेंद्र पाटील, अॅड. अनिल पाटील, अॅड. व्ही. आर. पाटील, अॅड. योगेश साळोखे, अॅड. आनंदराव पाटील, आदी उपस्थित होते.
कुलूप काढले तोडून
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला लावलेले कुलूप पोलिसांनी आंदोलनानंतर दगडाने फोडून काढून प्रवेशद्वार उघडे केले. मुख्य जिल्हा न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्यासमोर हे कुलूप पोलिसांनी काढले. यावेळी जमादार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
संघटनांनी फिरवली पाठ
शहरात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना प्रत्येक वेळी वकिलांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवितात; पण शनिवारी झालेल्या वकिलांच्या आंदोलनावेळी बहुतांश स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत होते.
इचलकरंजीतही बहिष्कार
इचलकरंजी : इचलकरंजी येथे न्यायालयातील विविध दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी झालेल्या लोक अदालतीमध्ये हातकणंगले तालुक्यातील १४ दावे निकाली निघाले. या अदालतीमध्ये एकूण १०८ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. लोक अदालतीमुळे दावे कमी होण्यास मदत होत असल्याचे तहसीलदार दीपक शिंदे यांनी सांगितले. या लोक अदालतीवर वकिलांनी बहिष्कार टाकला होता.