सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन सात दिवसांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:56+5:302021-05-18T04:25:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली ...

सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन सात दिवसांनी वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, किराणा, फळे व भाजीपाला विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवून घरपोहोच सेवा देता येणार आहे. उद्या, बुधवारपासून २६ मेपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला तीन दिवसांची मुदतवाढ दिली होती. मंगळवारी सकाळी त्याची मुदत संपणार होती. मात्र, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी त्याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ७ मेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. शनिवारी त्यास तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. हेच निर्बंध आता वाढविण्यात आले आहेत. १९ मेपासून २६ मेपर्यंत नवीन नियमांनुसार लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल.
-----------------------------------------------------
कृषी सेवा केंद्रांना परवानगी
सध्या शेतीतील कामे सुरू झाल्याने कृषी सेवा केंद्रांना सकाळी ७ ते ११ वेळेत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरीप हंगामाची कामेही करता येणार आहेत.
-----------------------------------------------------
कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरूकपणाचे दर्शन घडवीत, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.
सोमवारचा दिवस म्हणजे आठवड्याची सुरुवात असते. रस्त्यावर सर्वत्र वर्दळ, नागरिकांची रस्त्यावरील गर्दी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, न्यायालये, खासगी आस्थापनांची कार्यालये फुल्ल झालेली असतात. परंतु, कालचा सोमवार त्याला अपवाद ठरला. रस्त्यावर, तसेच सरकारी कार्यालयात असे चित्र कोठेच दिसले नाही. एरव्ही भाजी मंडईत झुंबड उडालेली असायची, गोंगाट असायचा; मात्र तेथेही सोमवारी नीरव शांतता होती. पोत्यांनी झाकलेल्या बुट्ट्या, त्यावर प्लास्टिकचे कागद आणि दगड ठेवलेले चित्र पाहायला मिळाले.