इचलकरंजीत लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:42+5:302021-05-17T04:21:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी या ...

इचलकरंजीत लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करीत स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दिला. पहाटेपासूनच रस्त्यावर सर्वत्र निरव शांतता पसरली होती. आठ दिवस या लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.
शहर व परिसरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने संचारबंदी व नंतर जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नव्हती. प्रशासन व वैद्यकीय सेवांवर याचा ताण वाढत होता. त्यामुळे प्रशासनाने १६ ते २३ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पालन करत नागरिकांनी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते.
शहराच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
प्रत्येक वाहनधारकाची कसून चौकशी सुरू होती. या कालावधीत दूध, भाजीपाला व गॅस यांची घरपोच सुविधा सुरू होती. तसेच पेट्रोल पंपावर केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांच्या वाहनात पेट्रोल दिले जात होते. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने वगळता इतर आस्थापना बंद होती. किराणा दुकान, बँक, उद्योगधंदे, प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. शासन नियमांच्या अंमलबजावणीसाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाची स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती. त्यानुसार शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.
जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट
जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक लॉकडाऊनसाठी यंत्रणा सज्ज करून शहरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, तपासणी नाके, गस्त अशी कारवाई सुरू आहे. यावर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्यासह तीन पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या लॉकडाऊनच्या पाहणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच पोलिस अधिकाºयांना सूचना दिल्या.
सामाजिक संस्थांकडून घरपोच सेवा
शहरात शिवभोजन व अनेक अन्नछत्र बंद होती. गरीब, गरजू व निराधार लोकांच्या जेवणाचा विचार करता घरपोच लोकांना जेवण दिले जात होते.
लॉकडाऊन संपेपर्यंत कारवाई
शहरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार आहे. प्रशासनाकडून याची सूचना दिली जात आहे. पोलिसांकडून नाकाबंदी, कडक पहारा व पेट्रोलिंगद्वारे लॉकडाऊन संपेपर्यंत अशीच कारवाई सुरू राहणार आहे.
फोटो ओळी
१६०५२०२१-आयसीएच-०१
१६०५२०२१-आयसीएच-०२
१६०५२०२१-आयसीएच-०३
लॉकडाऊनच्या निर्णयाचे पालन करत नागरिकांनी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले होते. त्यामुळे के.एल. मलाबादे चौकामध्ये असा शुकशुकाट जाणवत होता.
छाया-अनंतसिंग