लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योगांची धडधड थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:38+5:302021-05-17T04:21:38+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील एमआयडीसींमधील उद्योग, कारखाने सुरू होते. कोरोनाचा संसर्ग वाढत ...

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योगांची धडधड थांबली
राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील एमआयडीसींमधील उद्योग, कारखाने सुरू होते. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकांनी आपल्या आस्थापना बंद ठेवून सहभागी होण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्यानुसार बहुतांश जणांनी रविवारी सकाळपासून त्यांच्या आस्थापना बंद ठेवल्या. त्यामुळे शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील उद्योग, कारखान्यांतील यंत्रांची धडधड थांबली. उद्योजक, कामगार, चहासह अन्य स्टॉलधारक, वाहनांनी नेहमी गजबजलेल्या एमआयडीसींमध्ये शुकशुकाट पसरला होता. लॉकडाऊन दि. २३ मे रोजी संपणार असून, त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार आहे. त्यामुळे उद्योग, कारखाने हे दि. २५ मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
कोरोना रोखण्यासाठी उद्योजकांनी त्यांचे कारखाने या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. एमआयडीसी बंद राहिल्याने लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली.
-अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅॅक.
चौकट
अत्यावश्यक सेवेतील उद्योग सुरू
या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील आणि कामगारांच्या राहणे, जेवणाची कंपनीच्या आवारातच व्यवस्था करणारे उद्योग सुरू आहेत. त्यांची संख्या जिल्ह्यातील एकूण उद्योगांच्या एका टक्का आहे. उर्वरित उद्योग, कारखाने आठ-नऊ दिवस बंद राहणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांची कामावर जाताना अडवणूक होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी गोशिमाचे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांनी केली.