जगणं कुलूपबंदसाठी : विश्वास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:09+5:302020-12-30T04:31:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे येते की सारे जीवनच उलटे-पालटे होऊन जाते. संकटामागून संकटे ...

जगणं कुलूपबंदसाठी : विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माणसाच्या आयुष्यात एखादे वर्ष असे येते की सारे जीवनच उलटे-पालटे होऊन जाते. संकटामागून संकटे येतात आणि माणूस हतबल होऊन जातो. तसाच अनुभव सरत्या वर्षाने कोल्हापूरसह साऱ्या जगाला दिला. त्यामुळे सरलेल्या वर्षाचे नावही नको, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात त्याला निरोप देताना दाटून आली आहे. या वर्षाने माणसाचे जगणंच कुलूपबंद करून टाकले.
जवळची माणसे होत्याची नव्हती झाली, नोकऱ्या गेल्या, आर्थिक संकट अंगावर आले. हजार-दोन हजार किलोमीटरचे अंतर, डोक्यावर संसार व खांद्यावर पोराबाळांना घेऊन लोक पायपीट करत गेले. जीवलगांना महिनोन्महिने भेटता आले नाही. वृत्तपत्रांतील व वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांनीही लोकांना भीती दाखवली. पर्यावरण स्वच्छ झाले, खून, मारामाऱ्या, अपघात कमी झाले. या काही चांगल्या घटना घडल्या, तरी माणसाच्या जीवनात हे वर्ष काळामिट्ट अंधारच घेऊन आले; पण त्या अंधारातही माणूस जगला, उद्या तरी काही चांगले घडेल या आशेवर... नवा दिस घेऊन नव्या वर्षात सूर्य उगवणार आहे. त्याच्या पोटात नक्कीच चांगले काही असेल, त्याचे स्वागत करुया...
मृत्यूने उडवला थरकाप
मागच्या वर्षात कोरोनाच्या महामारीत रोजच्या बघण्यातील लोकांचा मृत्यू पाहण्याची वेळ अनेकांवर आली. सरपंच, नगरसेवक, महसूल, आरोग्य, पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत शेकडो लोकांचा या काळात मृत्यू झाला. कोरोनाच्या आजारापेक्षा त्याच्या भीतीनेच अनेकांचा थरकाप उडवला. सामाजिक हानी होईल, अशी अनेक चांगली माणसे कोरोनाने आपल्यातून हिरावून नेली. फक्त सर्दी-खोकला झाला म्हणून तपासणीसाठी स्वत: चालत रुग्णालयात आलेल्या लोकांचे मृतदेहही त्यांच्या घरापर्यंत पोहोचला नाहीत. निळ्या प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेला मृतदेह पाहणेही जीवघेणे ठरले. अंत्यसंस्काराचा विधी नाही, रक्षाविसर्जन नाही की नैवेद्य नाही. कावळा नाही, भावकी नाही की बारावे नाही. हे सगळे त्या कोरोनामुळे घडले.
निधन वृत्ताचाही धसका
पंचगंगा स्मशानभूमी दिवसरात्र अंत्यस्ंस्कारांच्या ज्वालांनी धगधगत राहिली. दहनासाठी शेणी कमी पडल्या. त्या देण्यासाठी अशा संकटातही कोल्हापूर पुढे धावून आले. ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होणाऱ्या निधनाच्या बातम्या वाचून लोकांच्या पोटात धस्स होत असे. त्यामुळे अनेक वाचकांनी कृपा करून या बातम्या प्रसिध्द करू नका, अशी विनंतीही केली..