सरोळीत अंगणवाडीला टाळे

By Admin | Updated: July 6, 2015 00:28 IST2015-07-05T23:48:03+5:302015-07-06T00:28:22+5:30

उपसरपंचांचे कृत्य : ग्रामपंचायत व्हरांड्यात भरली शाळा

Lock the anganwadi | सरोळीत अंगणवाडीला टाळे

सरोळीत अंगणवाडीला टाळे

नेसरी : शासन सर्वशिक्षा अभियान राबविण्यासाठी जोरदार प्रयत्नशील असतानाच सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे मात्र अंगणवाडीतील शिक्षिका, मदतनीस व चिमुरड्यांना शाळेच्या बाहेर काढण्याची धक्कादायक घटना घडली. उपसरपंचानीच खुद्द गावातील अंगणवाडी इमारतीला शनिवारी (दि.४) सकाळी कुलूप लावल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मौजे सरोळी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीजवळ श्री कुंज अंगणवाडी क्रमांक २७१ची इमारत आहे. येथे अंगणवाडीसेविका म्हणून मंगला धोंडिबा पाटील व मदतनीस म्हणून लता शिंदे कार्यरत आहेत.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शाळा भरली असताना आठ वाजता उपसरपंच मनोहर सुतार अंगणवाडीत गेले. यावेळी त्यांनी जमा-खर्चाच्या हिशेबावरून सेविका पाटील यांना विचारणा केली. यावेळी चर्चेतून काही निष्पन्न न झाल्याने सुतार यांनी पाटील व मदतनीस शिंदे यांच्यासह बालकांना बाहेर काढून शाळेस कुलूप लावले.
संबंधित प्रकार पाटील यांनी अंगणवाडीच्या वरिष्ठ पर्यवेक्षिका कुमुदिनी देसाई यांना कळविला व पुन्हा ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यामध्ये शाळा भरवल्याची माहिती दिली. तसेच सायंकाळी झाल्या प्रकाराची तक्रार नेसरी पोलिसांत दिली व आपल्या अंगणवाडीसेविका संघटनेलाही याबाबत कळविल्याचे सांगितले.
शनिवारी रात्री पुन्हा या शाळेचे कुलूप काढल्याचे निदर्शनास आले. मात्र, रविवारी दिवसभर या इमारतीला कुलूप नव्हते. याबाबत योग्य ती कार्यवाही होईपर्यंत आपण ग्रामपंचायत इमारतीच्या व्हरांड्यातच शाळा भरविणार असल्याचे सेविका पाटील यांनी सांगितले.(वार्ताहर)


सरपंचपद रिक्तच
भटक्या विमुक्त जमातीतून निवडून येऊन सरपंच झालेल्या संगीता भैरू बागडी यांनी आठ महिन्यांपूर्वी वैयक्तिक कारणामुळे यापूर्वीच आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रवर्गातील अन्य सदस्य नसल्याने गावचे सरपंचपद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कार्यभार उपसरपंचांकडे दिला असल्याचे समजते.


चिमुरड्यांना त्रास
एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बालमनावर संस्कार करण्याचे केंद्र म्हणून अंगणवाडीकडे पाहतो. मात्र, या चिमुरड्यांसमोरच गावच्या राजकारणांमुळे शाळेच्या बाहेर पडून इतरत्र जाण्याची लाजिरवाणी वेळ आली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.

मला याबाबतची माहिती फोनवरून मिळाली. त्यामुळे मी शनिवारी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबतचा अहवाल आज, सोमवारी गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये देण्यात येणार आहे.
- कुमुदिनी देसाई, पर्यवेक्षिका

अंगणवाडी शाळेला कुलूप लावले असल्याची घटना खोटी आहे. यापूर्वी मी पाटील यांना ग्रामपंचायतीमध्ये शालेय पोषण आहार खर्चाबद्दल विचारणा केली होती. तेव्हा हे माझ्या विरोधात राजकीय षड्यंत्र आहे. तसा तक्रार अर्जही नेसरी पोलिसांत दिला आहे.
- उपसरपंच सुतार

Web Title: Lock the anganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.