‘मोनेरा’च्या मोहनकडून आंब्यातील सर्पांना जीवदान
By Admin | Updated: August 18, 2015 22:14 IST2015-08-18T22:14:31+5:302015-08-18T22:14:31+5:30
पर्यावरणाची जोपासना : सर्पकुळातील दुर्मीळ जातींच्या रक्षणाचे व संशोधनाचे काम

‘मोनेरा’च्या मोहनकडून आंब्यातील सर्पांना जीवदान
आर. एस. लाड -आंबा नागपंचमीला नागाचे पूजन करून शेतकऱ्याचा मित्र असलेल्या सर्पाचे महत्त्व प्राचीन काळापासून सणाच्या माध्यमातून जपले जाते. काही मंडळी नागपंचमीला नागाचे पूजन करतात, तर अन्यवेळी साप म्हटले की, हातात काठी घेतात. मात्र, आंबा- विशाळगड या जैवविविधता संपन्न भागात कोल्हापूर निसर्गमित्र व मोनेरा फाउंडेशन येथील सर्पकुळातील दुर्मीळ जातींच्या रक्षणाचे व संशोधनाचे काम गेल्या काही वर्षांपासून करून, निसर्गप्रेमाचे महत्त्व समाजात फुलवत आहेत.
मोनेरा फाउंडेशनचे सचिव प्रमोद माळी व कार्याध्यक्ष मोहन घाटगे हे सर्पमित्र जगात दुर्मीळ असलेल्या मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर यासह नाग, अजगर, मण्यार, धामण, कौड्या, पहाडी तस्कर, विटेकरी मांडूळ फुरसे, घोणस, हरणटोळ, गवत्या यांचे संशोधन करीत संरक्षणाचीही बाजू भक्कम करीत आहेत. कोल्हापूरचे सर्प अभ्यासक उमाकांत चव्हाण यांनी पश्चिम घाटातील आंबा-विशाळगड येथील जंगलात जगात दुर्मीळ असलेल्या मलबार पिट वायपर या अतिविषारी प्रजातीबद्दल संशोधनात्मक अभ्यास करून त्याच्या संवर्धनाचा जागर केला. त्यातून येथील मोहन व प्रमोद यांचेसारखे स्थानिक सर्पमित्र सर्पसंरक्षणाची धुरा सांभाळीत आहेत. जंगला लगतच्या वस्त्या, रिसॉर्ट व हॉटेल तसेच सार्वजनिक कार्यालयातील सर्पाचा मुक्काम सामान्यांना धडकी भरवणारा असला तरी या सर्पमित्रांना पाचारण करून त्यांना सुरक्षित पकडून त्यांच्या अधिवासामध्ये सोडणारे पर्यावरणीय काम जोपासत आहेत.
मोनेराचे इंद्रजित सूर्यवंशी वारणा परिसरात सर्प संवर्धनाची जागृती करीत आहेत. मोनेराच्या मोहनची जणू सापांनाच मोहिनी पडलेली दिसते. अंधश्रद्धेपोटी व काही आजारांवर तेल काढण्यास विशिष्ट सापांची तस्करी केली जाते. यावर अंकुश ठेवणारे काम येथे होताना दिसते. खोपोली येथील सर्पसंशोधन संस्थेचे प्रमुख प्रदीप कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात वाघझरा परिसरात भेट देऊन पिट वायपर व अन्य दुर्मीळ सापाच्या संशोधनास हा परिसर महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले.
मोहन घाटगे यांच्या गेल्या तीन वर्षांच्या निरीक्षणात हरणटोळ सहज व मोठ्या प्रमाणात दिसणारा साप यंदा तुलनेने कमी पहायला मिळतो. याची कारणे शोधून तसे उपाय शोधावे लागतील.
रोडकिल्सबाबत जागृतीची गरज
कोल्हापूर निसर्गमित्र मंडळाचे सर्पतज्ज्ञ किशोर शिंदे यांनी पोलादपूर, महाबळेश्वर व घाटरस्ते या भागात सापांचे रोडकिल्स मोठ्या प्रमाणात होते. जंगलातील रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या जमिनीच्या कंपनांची तीव्रता कमी असते. त्यामुळे रस्ता ओलांडणारे साप वाहनाखाली बळी पडतात. साहजिकच दुर्मीळ साप अतिदुर्मीळ होतात. याउलट अन्य मार्गांवर कंपनांची तीव्रता जास्त असल्याने रोडकिल्स कमी होतात. यावर उपाय म्हणून जंगल परिसरातील रात्रीचे दळणवळण बंद होण्याची गरज शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.