दरीत पडलेल्या वृद्धाला जीवदान
By Admin | Updated: June 6, 2016 00:50 IST2016-06-05T22:51:29+5:302016-06-06T00:50:58+5:30
करुळ घाटातील घटना: कोल्हापुरातील रहिवाशी; जीव धोक्यात घालून तरुणाने वाचवले

दरीत पडलेल्या वृद्धाला जीवदान
वैभववाडी : कोल्हापूर येथील हमीद इस्माईल पठाण (वय ५५, रा. सदरबाजार मटण मार्केट) हे करुळ घाटातील ५0 फूट दरीत आढळून आले. तब्बल २४ तास दरीत काढलेल्या पठाण यांना कोल्हापुरातील राहुल सावंत (रा. राजारामपुरी) यांच्या मदतीने वैभववाडी पोलिसांनी दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढले. पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून, त्यांच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
करूळ घाटात कोणीतरी पडले असल्याची माहिती दूरध्वनीवरून पोलिसांना मिळाली. परंतु, नेमके ठिकाण समजले नव्हते. त्यामुळे ही माहिती म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक तर नव्हे ना? अशी सुरुवातीला सर्वांना शंका आली. तरीही पोलीस उपनिरीक्षक एस. के. हवालदार संजय खाडे, राजू जामसंडेकर, सुनील राणे, अनमोल रावराणे, सचिन सापते, दादासाहेब कांबळे, महिला पोलीस हरमलकर घाटात पोहोचले. घाटमार्गालगत शोध सुरु असताना गगनबावड्याच्या हद्दीनजिकच्या दरीत सुमारे ५0 फुटांवर झुडपात पठाण बसलेल्या स्थितीत आढळले.
दरीत उतरण्यासाठी पोलिसांनी दोरखंड बांधला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले राहुल सावंत इतरांप्रमाणे केवळ बघ्याची भूमिका न बजावता दरीत उतरले. त्यापाठोपाठ पोलीस शिपाई सचिन सापते व दादासाहेब कांबळेही उतरले. सुमारे २४ तास दरीत काढल्यामुळे पठाण यांना थकवा आला होता. शिवाय त्यांच्या पायाची शस्रक्रिया झालेली असल्याने त्यांना नीट पाय टेकवता येईना. त्यामुळे सावंत यांनी जीव धोक्यात घालून अतिशय निसरड्या वाटेने दोरखंडाचा आधार घेत आपल्या पाठीवरून पठाण यांना दरीतून बाहेर काढले. सावंत यांना सापते व कांबळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी साथ दिली. पोलिसांनी पठाण यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, रस्त्यावर आणल्यावर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पठाण यांनी आपली ओळख सांगितली. आपण चालक होतो. मात्र, पायावर शस्रक्रिया झाल्याने सध्या हमाली करतो. शनिवारी सकाळी ओळखीच्या ट्रकने कणकवलीला गेलो. तेथून पुन्हा ट्रकने कोल्हापूरला जाताना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास आपण घाटात उतरलो. कठड्यावर बसलेलो असताना तोल जाऊन आपण पडलो, असे हमीद पठाण यांनी पोलिसांना सांगितले. परंतु, ते दरीत ज्या ठिकाणी आढळले त्याच्या अलीकडे सुमारे ३0 फुटांवर त्यांच्या दोन्ही चप्पल नीट ठेवलेल्या आढळल्या. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. (प्रतिनिधी