तोट्यामुळे सूतगिरण्या बंद ठेवणार
By Admin | Updated: July 9, 2016 00:59 IST2016-07-09T00:36:31+5:302016-07-09T00:59:36+5:30
तासगाव सूतगिरणीत आज बैठक : नवीन हंगामी कापूस बाजारात येईपर्यंत बंद; सरकारचेही दुर्लक्ष

तोट्यामुळे सूतगिरण्या बंद ठेवणार
इचलकरंजी : उत्पादनाच्या खर्चाप्रमाणे सूतगिरण्यांना सुताचा भाव मिळत नाही आणि सरकारचे होत असलेले दुर्लक्ष अशा पार्श्वभूमीवर विशेषत: सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी, बाजारात नवीन कापूस येऊन त्याचे भाव कमी होईपर्यंत चार महिने गिरण्या बंद ठेवण्याचा विचार गिरण्यांचे संचालक करीत आहेत.
वस्त्रोद्योगामध्ये गेल्या वर्षभरापासून कापडाला मागणी नसल्याने कापडाचे भाव वाढत नाहीत. त्यामुळे सुतालाही भाव मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये गतवर्षी सरकारच्या अनुदानानुसार होणारे कापसाचे पीक तीन कोटी ७० लाख गाठ्यांऐवजी जेमतेम तीन कोटी गाठी एवढेच झाले, तर चांगले कापूस पीक येईल म्हणून सरकारने कापूस निर्यातीला परवानगी दिल्याने ७० लाख गाठी कापूस निर्यात झाला. याचा परिणाम म्हणून चालू वर्षी एप्रिल-मे महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर कापसाची टंचाई बाजारात निर्माण झाली आहे.
यंदा मान्सूनच्या पावसाने उशिरा सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ-मराठवाड्यामध्ये कापसाची पेरणी उशिरा झाली. आता येणारे कापूस पीकसुद्धा एक महिन्याने लांबणीवर पडणार म्हणून ज्या व्यापाऱ्यांकडे कापूस आहे, त्यांनी कापसाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढविले आहेत. १ जूनला ३२ हजार ते ३५ हजार प्रतिखंडी मिळणारा कापूस आता १ जुलैला ४२ हजार रुपये झाला आणि त्याची आजची किंमत २५ हजार ५०० रुपये प्रतिखंडी आहे. कापसाचे भाव वाढण्याबरोबरच विजेचे भावसुद्धा वाढलेलेच आहेत. याचा परिणाम म्हणून सहकार क्षेत्रातील गिरण्यांना प्रतिकिलो सुतामागे ३० ते ३२ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. हे नुकसान १२ हजार ५०० चात्यांच्या गिरण्यांना दररोज दोन लाख रुपये, तर २५ हजार चात्यांच्या गिरण्यांना दररोज पाच लाख रुपये झाले आहे.
अशा पार्श्वभूमीवर आज, शनिवारी दुपारी तीन वाजता तासगाव येथील रामानंदभारती सहकारी सूतगिरणीवर कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील सहकारी सूतगिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बैठक पृथ्वीराज देशमुख आणि आमदार सुमनताई पाटील यांनी आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये विचारविनिमय होऊन नवीन हंगामी कापूस बाजारात येऊन कापसाचे भाव कमी होईपर्यंत चार महिने सूतगिरण्या बंद ठेवण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. (प्रतिनिधी)