लिपिकास मारहाण? महापालिकेचे कामकाज ठप्प
By Admin | Updated: September 2, 2015 00:05 IST2015-09-02T00:05:49+5:302015-09-02T00:05:49+5:30
तणावाचे वातावरण : अतिक्रमण कारवाईस फरास यांचा विरोध; आदेश पाळण्यावरुन कर्मचाऱ्यांची गोची

लिपिकास मारहाण? महापालिकेचे कामकाज ठप्प
कोल्हापूर : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या लिपिकाला मारहाण केल्याच्या अफवेने महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काही काळ कामकाज बंद ठेवले. यावेळी महापालिकेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्व कर्मचारी एकत्र आल्याने तणावाचे वातावरण होते. काही वेळाने अतिक्रमण विभागाचे लिपिक पंडितराव पोवार यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितल्याने सर्व कर्मचारी कामावर परतले.स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि. २८ आॅगस्ट) उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार यांनी लुगडी ओळ येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरातील नवीन अतिक्रमित केलेल्या मिळकती हटवाव्यात, असा आदेश दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे लिपिक पंडितराव पोवार हे सोमवारी सायंकाळी लुगडी ओळ परिसरात कर्मचाऱ्यांसह गेले. त्यावेळी परिसरातील रूपम नाष्टा सेंटर या चहा विक्रेत्या केबिनधारकास भेटले. त्याला त्यांनी दोन दिवसांत संबंधित अतिक्रमित केबिन काढून घ्यावी, अन्यथा कारवाईचा विभागामार्फत इशारा दिला. त्यामुळे त्याने नगरसेवक आदिल फरास यांना कारवाईबाबतची कल्पना दिली. त्यावेळी फरास यांनी थेट पोवार यांना मोबाईलवरून कोणीही आदेश देऊ दे, पण केबिन जाग्यावरून काढायची नाही, असे सुनावले. त्यानुसार हे अतिक्रमणचे पथक रिकाम्या हातांनी परतले. दरम्यान, पंडितराव पोवार यांना फरास यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची अफवा मंगळवारी सकाळी महापालिकेत पसरली. त्यामुळे सकाळी अकरा वाजता सर्वच कर्मचाऱ्यांनी कामच सुरू केले नाही. सुमारे सातशे कर्मचारी काम बंद ठेवून एकत्र आले. काही वेळातच पोवार हे महापालिकेत आले. पाठोपाठ फरासही आले. फरास यांनी सर्वच अतिक्रमित केबिन काढाव्यात; मगच लुगडी ओळ येथील केबिन हलवावी, असे सांगून पोवार यांना आपण मारहाण अगर शिवीगाळ केली नसल्याचा सर्वांसमोर खुलासा केला. गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचारी निघून गेले अन् कामकाज सुरू झाले.
अतिक्रमण विभाग सहा वर्षे अधिकाऱ्याविना
महापालिकेतील महत्त्वाचा असा हा अतिक्रमण विभाग आहे. महापालिका निवडणूक नजीक असल्याने दोन नगरसेवकांच्या वादात अतिक्रमण विभागाला आदेश देऊन कारवाई करण्याचा सपाटा काहींनी लावला आहे; पण यामध्ये या विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे.
विशेष म्हणजे, गेली सहा वर्षे या विभागाला सक्षम अधिकारी नाही. पंडितराव पोवार हे लिपिक असून हेच हा विभाग चालवीत आहेत; पण त्यांना या विभागातील निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी या विभागासाठी अधिकारी नेमावा, अशी मागणी केली आहे.