धार्मिक गरजा पूर्ण करणारी लाईन बझार मस्जिद
By Admin | Updated: July 15, 2014 01:01 IST2014-07-15T00:37:34+5:302014-07-15T01:01:22+5:30
१०८ वर्षे पूर्ण : धार्मिक विधी सुरू; कार्यक्रमांची रेलचेल

धार्मिक गरजा पूर्ण करणारी लाईन बझार मस्जिद
एम. ए. पठाण - कोल्हापूर
लाईन बझार मस्जिदतर्फे परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मस्जिद, इदगाह, कब्रस्तान या तिन्ही धार्मिक गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतात. परिसरात मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असली, तरी येथील सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहत असल्याने येथे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडते. सध्या रमजान महिन्यात धार्मिक विधी सुरू असून त्याची मस्जिद परिसरात रेलचेल पाहावयास मिळते.
लाईन बझार मस्जिद ही शाहूकालातील मस्जिद आहे. मुस्लिम तिथीप्रमाणे हिजरी सन १३२७ मध्ये या मस्जिदची स्थापना झाली. आज ही मस्जिद १०८ वर्षांपूर्वीची आहे. याचा उल्लेख मस्जिद प्रवेशद्वाराच्या दगडी कमानीजवळ असणाऱ्या शिलालेखात आढळतो. मस्जिदच्या बाजूला ईदगाहसाठी छोटे पटांगण आहे. या पटांगणावर रमजान व बकरी ईदची नमाज, खुतबा पठण होत असते. सर्किट हाऊसच्या मागच्या बाजूला सुमारे ७ ते ८ एकरांचे मुस्लिम कब्रस्तान आहे.
मस्जिदचे कामकाज सुन्नत मुस्लिम जमात, मस्जिद आणि कब्रस्तान या संस्थेतर्फे होते. जमातीचे ४६५ सभासद आहेत. मुस्लिम बांधवांच्या सुख-दु:खात जमात बांधव सहभागी असतात. तसेच एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाची ऐपत नसेल, तर अंत्यविधीचा खर्च जमात करते. जमातीतर्फे कॅटरिंग सुविधा असून, गरजू मुस्लिम बांधव याचा लाभ घेतात. मस्जिदमध्ये नमाज, तरावीह पठणाचे कार्य पेशमाम मौलाना अब्दुल खलील सिद्धिकी करतात. विशेष म्हणजे तरावीहमध्ये होणाऱ्या पवित्र कुरआन शरीफच्या पठणाचे थोडक्यात अर्थ बयान (प्रवचनाद्वारे) सांगतात. मस्जिद परिसराची देखभाल, स्वच्छता बागी बिलालसाब उर्फ पोलाद हसन पठाण हे प्रमाणिकपणे बजावत आहेत.रोजा इफ्तार हा मस्जिद समोरील रिकाम्या परिसरात होत असतो. समाजातील काही व्यक्ती रोजा इफ्तारसाठी खाद्यपदार्थांचे वाटप करतात. तर काही वेळा येथे जेवणाची व्यवस्था केली जाते.
सुन्नत मुस्लिम जमात, मस्जिद आणि कब्रस्तानचे कार्यकारी संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : प्रेसिडंट दादासाहेब बाळासाहेब सय्यद, व्हा. प्रेसिडंट नासीर दस्तगीर सय्यद, सेक्रेटरी- असफअली हैदर मुजावर, जॉ. सेक्रेटरी इमामुद्दीन अनवरद्दीन शेख, लो. आॅडिटर असिफ अन्वर मुजावर, सदस्य ताजुद्दीन मकबूल शेख, अख्तर हाजी इकबाल शेख, लियाकत कासम पठाण, बालेखान दुलेखान पठाण, नासिरखान अब्दुलखान पठाण, आलताफ आमीन पेंढारी यांचा संचालक मंडळात समावेश आहे.