गुन्हेगारीच्या दलदलीत कमळ फुलणार नाही : प्रल्हाद चव्हाण
By Admin | Updated: October 31, 2015 00:24 IST2015-10-31T00:21:53+5:302015-10-31T00:24:35+5:30
राज्यात आणि केंद्रात जनतेला भुलवून भाजपने सत्ता मिळविली. राज्यातील सत्तेत चंद्रकांत पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिपदही मिळाले; पण

गुन्हेगारीच्या दलदलीत कमळ फुलणार नाही : प्रल्हाद चव्हाण
कोल्हापूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला कोल्हापुरात ८१ प्रभागांत उमेदवार मिळाले नाहीत. हे पालकमंत्र्यांचे दुर्दैव आहे; पण काहीही करून महापालिकेत सत्ता मिळवायची, या उद्देशाने त्यांनी ताराराणी आघाडीशी घरोबा केला; पण गुन्हेगार व गुंडप्रवृत्ती ही संस्कृती असणाऱ्या ताराराणी आघाडीशी सलगी दादांना लाभणार नाही. दलदलीत कमळ फुलतं.. हे जरी खरे असले तरी गुन्हेगारीच्या दलदलीत कमळ फुलणार नाही, नव्हे कोल्हापूरची जनता तसे होऊच देणार नाही, असे पत्रक काँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
राज्यात आणि केंद्रात जनतेला भुलवून भाजपने सत्ता मिळविली. राज्यातील सत्तेत चंद्रकांत पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिपदही मिळाले; पण या मंत्रिपदाचा कोल्हापूरच्या विकासासाठी गेल्या वर्षभरात काहीही फायदा झालेला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला ८१ उमेदवार मिळाले नाहीत. उलट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन शहराला बदनाम करणाऱ्या ताराराणी आघाडीबरोबर अभद्र युती करण्यात धन्यता मानली.
भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्यांची उमेदवारांची यादी पाहता, यातील बहुतेक जण ताराराणी आघाडीचे पर्यायाने महाडिक यांचेच यांचे कार्यकर्ते आहेत. अशाप्रकारे पालकमंत्र्यांनी भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला महाडिक यांच्या दावणीला बांधले आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
महापालिकेच्या सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या पालकमंत्र्यांना कोल्हापुरात कमळ फुलवायचे आहे. किंबहुना हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असे असले तरी त्यांनी ज्या ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामध्ये गुंड, गुन्हेगार, मटकेवाले, टीडीआर सम्राट यांचाच भरणा आहे. या दलदलीत कधीही कमळ फुलणार नाही. हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता या अभद्र युतीला त्यांच्या विचारांना कोल्हापुरात थारा देणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)