‘गावची तहान’ मिटविण्यासाठी धडपडतोय ‘प्रकाश’!
By Admin | Updated: May 27, 2016 00:09 IST2016-05-26T23:10:13+5:302016-05-27T00:09:19+5:30
टंचाईग्रस्त बुगडीकट्टी : स्वखर्चातून केले ओढापात्राचे रुंदीकरण, बांधला मातीचा बंधारा : लोकमत जलमित्र अभियान

‘गावची तहान’ मिटविण्यासाठी धडपडतोय ‘प्रकाश’!
राम मगदूम --गडहिंग्लज --तहानलेल्या गावाची, मायभूमीतील बाया-माणसांची आणि गुरा-ढोरांची तहान मिटविण्यासाठी दूरदेशी राहणारा एक सहृदयी माणूस धडपडतो आहे. स्वत:च्या मिळकतीतून त्याने गावच्या ओढ्याच्या पात्राचे रुंदीकरण केले असून, पाणी अडविण्यासाठी ओढ्यात मातीचा बांधदेखील घातला आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना उजेडाचा रस्ता दाखविणाऱ्या या भूमिपुत्राचे नाव आहे प्रकाश रामचंद्र रेडेकर..!
बुगडीकट्टी! गडहिंग्लजच्या दुष्काळी पूर्वभागातील अडीच हजार लोकवस्तीचं गावं. गुडलकोप व बुगडीकट्टीच्या डोंगरात वसलेले आणि विकासापासून वंचित गाव. डोंगरातून वाहणारा ओढा हाच एकमेव जलस्रोत. त्यावर दगडी बंधारे घालून सरकारने गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले ते बंधारेही डागडुजीअभावी निकामी आणि गाळाने भरले आहेत. पात्रात
झाडे-झुडपे वाढल्यामुळे आता ‘ओढा’ देखील शोधावा लागतो.
गावाला ना नदी, ना तलाव. त्यामुळे ‘तेरणी’च्या तलावावर नळयोजना राबविली. पण, तलावही पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे ही नळ योजनादेखील कुचकामी ठरली आहे. गावातील सार्वजनिक विहीरदेखील आटली असून, केवळ अर्धा इंच पाणी असणाऱ्या एकमेव बोअरचे पाणीदेखील पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच येणाऱ्या नळाच्या पाण्यासाठी लहान-थोरांसह आया-बहिणींची धावाधाव होते. त्यांचे हाल संपावेत म्हणूनच ‘प्रकाश’ने हे काम केले आहे.
डोंगर माथ्यावरून येणारे पाणी ओढ्यात अडविण्यासाठी नवीन बंधारे बांधावेत, यासाठी त्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळेच यंदाच्या दुष्काळाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हे काम केले आहे. असे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.