लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील गोपाळ समाजातील कुटुंबात अखेर उजेड पडला. महावितरणने जिल्हा नियोजनच्या निधीतून वीज जोडणी दिल्याने या कुटुंबामधून समाधान व्यक्त होत आहे.
गेली अनेक वर्षे गोपाळ समाजातील वीस कुटुंब गावापासून दूर राहतात. त्यामुळे त्यांना शेती पंपांच्या फिडरवरुन वीज जोडली होती. मात्र, पावसाळ्यात तीन-चार महिने त्यांना अंधारातच राहावे लागत होते. याबाबत इरिगेशन फेडरेशनकडे या कुटुंबांनी तक्रार केली होती. पावसाळ्यात या कुटुंबांची होणारी परवड पाहून महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचा निर्णय घेतला. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण होतातच असे नाही. मात्र, याला अंकुर कावळे हे अपवाद ठरले. त्यांनी वेळेपूर्वी या कुटुंबांना वीज दिली.
ट्रान्सफार्मरचे उद्घाटन अंकुर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, सखाराम चव्हाण, मारूती पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव पाटील, गुणाजी जाधव, बालिंगा स्टेशनचे कनिष्ठ अभियंता जोशिलकर, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील गोपाळ समाजासाठी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, विक्रांत पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-२७०६२०२१-कोल- पाडळी)