लिफ्ट देऊन पाऊण लाखाला लुटले

By Admin | Updated: March 12, 2015 23:52 IST2015-03-12T23:42:00+5:302015-03-12T23:52:19+5:30

जीपमध्ये सहाजणांचे कृत्य : कऱ्हाडातून कोल्हापूरला जाताना जयवंत शुगरच्या अधिकाऱ्याची लूट

Lifted by lifts | लिफ्ट देऊन पाऊण लाखाला लुटले

लिफ्ट देऊन पाऊण लाखाला लुटले

कऱ्हाड : लिफ्ट देण्याचा बहाणा करून सहाजणांनी जयवंत कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास सुमारे ७५ हजारांना लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. याबाबत धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संभाजी गोविंद देसाई (रा. तोरस्कर चौक, कोल्हापूर) यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संभाजी देसाई हे बुधवारी काम आटोपल्यानंतर कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. ते कारखान्याच्या वाहनातून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडातील कोल्हापूर नाका येथे आले. नाक्यावर कोल्हापूरला जाण्यासाठी ते एस.टी.ची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी सातारा बाजूकडून आलेली एक पांढऱ्या रंगाची जीप देसाई यांच्याजवळ येऊन थांबली. त्यावेळी जीपमधील एकाने देसाई यांना ‘कोठे जाणार आहे?,’ अशी विचारणा केली. देसाई यांनी कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगितल्यानंतर संबंधिताने त्यांना ‘जीप कोल्हापूरलाच जात असून, तुम्ही बसा,’ असे सांगितले. त्याच्या सांगण्यानुसार देसाई जीपमध्ये बसले. त्यावेळी जीपमध्ये चालकाशेजारी दोघे, मधल्या सीटवर दोघे, तर पाठीमागील सीटवर दोघे बसले होते. जीप कऱ्हाडपासून काही अंतरावर गेल्यानंतर चालकाशेजारी बसलेल्यांपैकी एकजण मधल्या सीटवर बसण्यास आला, तर मधल्या सीटवरील एकजण चालकाशेजारी जाऊन बसला. संभाजी देसाई यांना काही कळण्यापूर्वीच पाठीमागील सीटवर बसलेल्या दोघांनी व शेजारील दोघांनी देसाई यांना दमदाटी करीत ओरडल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच जीपच्या काचा बंद करून घेतल्या. चालकाने जीपमधील टेपचा आवाजही वाढविला. शेजारी बसलेल्या दोघांनी देसाई यांच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या, हातातील घड्याळ, मोबाईल आणि पाकिटातील एक हजार ३०० रुपये असा सुमारे ७५ हजारांचा ऐवज काढून घेतला. या कालावधीत जीप कासेगावपर्यंत पोहोचली. संशयितांनी संभाजी देसाई यांना कासेगाव हद्दीत निर्जनस्थळी सोडले आणि जीप कोल्हापूरच्या दिशेने निघून गेली. गुरुवारी दुपारी याबाबत देसाई यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)


शंभर रुपये दिले परत
कासेगाव येथे पोहोचल्यानंतर संशयितांनी संभाजी देसाई यांना जीपमधून खाली उतरविले. त्यावेळी एकाने देसार्इंना ‘आता कुणीकडे जाणार,’ अशी विचारणा केली. देसाई यांनी कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगितल्यानंतर संशयितांपैकी एकाने लुटीतील शंभर रुपये काढून ते परत देसाई यांना दिले. तसेच मोबाईलमधील सीमकार्डही काढून घेतले.

Web Title: Lifted by lifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.