जनसेवेसाठी आयुष्य वेचले
By Admin | Updated: August 12, 2014 00:40 IST2014-08-12T00:30:45+5:302014-08-12T00:40:12+5:30
राजू शेट्टी : आंबेडकरांच्या तत्त्वानुसार संघटित होऊन संघर्ष केला

जनसेवेसाठी आयुष्य वेचले
पेठवडगाव : प्रवाहाच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी नानासाहेब माने यांनी आयुष्य वेचले. समाजातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची सोय करून शिक्षणांची संधी दिली. त्यांच्या कार्यात अडचणी आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठीशी राहील, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये माजी आमदार नानासाहेब माने यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सपत्निक सत्कार खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. यावेळी माजी आमदार नरसिंह गुरुनाथ पाटील, नगराध्यक्षा विद्या पोळ, माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव प्रमुख उपस्थित होते.
खासदार शेट्टी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर राजकारणात ठरावीक सत्ताकेंद्रे निर्माण झाली. या सत्ताधाऱ्यांनी सामान्याला विकासापासून वंचित ठेवले आणि स्वत:चा स्वार्थ साधला. तर आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वानुसार संघटित होऊन संघर्ष केला. पारंपरिक व ठरावीक सत्ताकेंद्रे शेतकऱ्यांच्या बांधावर नेली. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला. यात यशस्वी ठरलो. जिल्ह्यात सुरू केलेली चळवळ देशात नेण्यासाठी युवकांनी व नागरिकांनी साथ दिली.
सत्काराला उत्तर देताना नानासाहबे माने म्हणाले, समाजात समता प्रस्थापित करावी यासाठी सामान्य जनतेच्या सेवेसाठी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला. राजकारणात प्रवेश करून थेट आमदारकीही मिळाली. या काळात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. नंतर कॉँग्रेस पक्षात पंधरा वर्षे काम केले. मात्र, संधी मिळाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.
प्राचार्य जे. डी. सिसाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुजाता माने, प्रविता सालपे, सुनीता पोळ, उर्मिला उंडाळे, प्रमिला माने, श्रीधर पाटील, अजय पाटील, डॉ. अशोक चौगुले, गुंडा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कट्टर विरोधक साडेपाच तास थांबले
४माजी आमदार नानासाहेब माने व माजी नगराध्यक्ष विजयसिंह यादव यांच्यात अनेक तात्त्विक वाद आहेत. यादव यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसास माने यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. तसेच व्यासपीठावर त्यांच्या नावाची खुर्ची सुद्धा आरक्षित ठेवली होती. तर आज माने यांनी यादव पिता-पुत्रींना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. ते दोघेजण कार्यक्रमासाठी साडेपाच तास आवर्जून थांबले
शेट्टी अखेर उशिरानेच आले
४खासदार राजू शेट्टी हे वेळेच्या बाबतीत काटेकोर नाहीत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळी सातपासून तयारी करीत होते. दहाचा कार्यक्रम दीड वाजण्याच्या सुमारास झाला. या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही सकाळपासून थांबले होते. त्यामुळे खासदार शेट्टी वेळेवर येत नाहीत. हा अनुभव कार्यकर्त्यांना आला. त्यामुळे ते उशिरा येतात, अशी चौकट लावा म्हणजे वेळेवर येतील, असा कार्यकर्त्यांचा चर्चेचा सूर होता.