उपनगरांत जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: July 10, 2016 01:48 IST2016-07-10T01:13:46+5:302016-07-10T01:48:42+5:30
पावसाची संततधार : रस्ते झाले जलमय; बुदिहाळनगर, दत्तोबा शिंदेनगरमधील घरांत पाणी

उपनगरांत जनजीवन विस्कळीत
कळंबा : शहर आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. महापालिकेचे पावसाळी पूर्वकामाचे नियोजन कागदोपत्रीच झाल्याचे या पावसाने पुन्हा सिद्ध झाले. उपनगरांतील रस्ते पाण्याखाली व नागरी वस्त्यांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.
उपनगरांची रचना उंच, सखल आहे. त्यात पालिकेने यंदाही नालेसफाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने क्रशर चौक ते लडगे चौक रस्ता, तांबड कमान ते जुना वाशीनाका रस्ता गुडघाभर पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.
राजलक्ष्मीनगर प्रभागातील शाम हौसिंग सोसायटी, दळवी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, जुईनगर, जलदर्शन कॉलनी, सुर्वेनगर प्रभागातील, बुदिहाळनगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, दत्तोबा शिंदेनगर या नागरी वस्त्यांत, तर काही ठिकाणी घरांत पाणी शिरले. पांडुरंगनगरी लगतचा ओढा भरल्याने ओढ्यालगत असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रच पाण्याखाली गेल्याने घनकचरा मिश्रित पाणी सरळ रंकाळ्यात मिसळत होते.
महामार्गावर वाहतूक विस्कळीत
वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही रांग सांगली फाटापर्यंत पोहोचली होती. सांगली फाटा जाम झाला. त्यातच पुण्याहून सेवामार्गाने येणारा कंटेनर सेवामार्गावर बंद पडला. तसेच पूर्वेकडील सेवामार्गावरून वाहतूक सुरू होती; पण त्या सेवामार्गावरून येणाऱ्या ट्रकवर झाड कोसळले. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली.
४वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोली पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी सांगली फाटा येथे होते, तर महामार्गाचे पोलिस फिरकलेच नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी तीन ते चार तास लागले. सायंकाळी सात वाजता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.
शिरोली : पुणे-बंगलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे भुयारी मार्गावर पाणी साचून आणि किरकोळ अपघातामुळे तावडे हॉटेल ते शिरोली सांगली फाटापर्यंत तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीन वाजता तावडे हॉटेल येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने येथे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावरून कोल्हापूर शहर आणि गांधीनगरकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडली.