संजय घाटगे यांचा जीव भांड्यात पडला
By Admin | Updated: August 22, 2014 00:32 IST2014-08-22T00:23:31+5:302014-08-22T00:32:46+5:30
कागल विधानसभा : दुरंगी लढत स्पष्ट

संजय घाटगे यांचा जीव भांड्यात पडला
कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून ‘महायुतीचे उमेदवार’ म्हणून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनीच नावाची घोषणा केल्याने माजी आमदार संजय घाटगे यांचा जीव अखेर भांड्यात पडला. संजय मंडलिक यांनी घाटगे यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वीच केली होती; परंतु मंडलिक यांनी त्याबाबत काहीच स्पष्ट भूमिका न घेतल्याने कागल तालुक्यात तर्क-वितर्कांना उधाण आले होते, त्याची स्पष्टता आज झाली. या मतदारसंघातून जलसंपदामंत्री ‘हसन मुश्रीफ विरुद्ध संजय घाटगे’ अशी लक्षवेधी लढत होऊ शकते.
मुश्रीफ यांचा पराभव केल्याशिवाय मी मरणार नाही, असे मंडलिक वारंवार म्हणत आले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा पराभव झाल्याने त्यांचे राजकीय भवितव्यही अनिश्चित बनले आहे. ते विजयी झाले असते तर घाटगे यांचा मार्ग तेव्हाच मोकळा झाला असता. त्यामुळे मंडलिक खरेच संजय घाटगे यांना पाठिंबा देणार की पुन्हा संजय मंडलिक यांच्यासाठी आग्रह धरणार याबद्दल संभ्रमावस्था होती.
त्यातच मध्यंतरी संजय घाटगे यांनी जनसुराज्यचे नेते विनय कोरे, शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे व युवराज संभाजीराजे यांच्या भेटीगाठी घेतल्याचे मंडलिक यांना आवडलेले नव्हते. घाटगे यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशीही सलोख्याचे संबंध आहेत, याचाही मंडलिक यांना राग होता. संजय घाटगे यांनी आतापर्यंत जनता दल, शिवसेना, स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस अशा विविध पक्षांकडून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे ते आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना कितपत विश्वास देतील, अशीही शंका मंडलिक बोलून दाखवित होते. घाटगे यांची उमेदवारी जाहीर करण्याबाबत या कारणांमुळेच विलंब होत होता. जोपर्यंत स्वत: मंडलिक संजय घाटगे यांच्या नावांची घोषणा करीत नाहीत तोपर्यंत गट म्हणून एकजूट होण्यात अडचणी होत्या. त्या सगळ््या अडचणी, संभ्रम गुरुवारी दूर झाला. या मेळाव्यात उमेदवारी जाहीर होणार हे माहीत असल्याने घाटगे यांनीही जय्यत तयारी केली होती. ते व्यासपीठावर आल्यावर त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. मंडलिक यांचा कार्यक्रम असताना तिथे घाटगे यांना एवढा प्रतिसाद मिळाला कारण घाटगे गटाचेच लोक तिथे जास्त होते. (प्रतिनिधी)