बालकल्याण संकुलचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:22+5:302021-05-12T04:25:22+5:30
कोल्हापूर : आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल न मिळाल्याने मंगळवारी बालकल्याण संकुलचा जीव टांगणीला लागला. आज बुधवारी अहवाल मिळेल असे सांगण्यात ...

बालकल्याण संकुलचा जीव टांगणीला
कोल्हापूर : आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल न मिळाल्याने मंगळवारी बालकल्याण संकुलचा जीव टांगणीला लागला. आज बुधवारी अहवाल मिळेल असे सांगण्यात आल्याने सर्वांमध्ये धाकधूक असून घालमेल वाढली आहे. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या १४ ही मुलींची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
रविवारी बालकल्याण संकुलमधील ६ ते १८ वयोगटातील तब्बल १४ मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. आतापर्यंत लहान मुलांपर्यंत न पोहाेचलेल्या कोरोनाने थेट बालकल्याण संकुलमधील अनाथालयात प्रवेश केल्याने प्रशासनही हादरले. तातडीने संकुल सॅनिटायझर करुन घेतले गेले. बाहेरुन येणाऱ्यांना प्रवेशही बंद केला. अन्य कोण कोण संपर्कात आले आहेत, हे तपासण्यासाठी सोमवारी संकुलमधील १२७ मुलांसह २६ कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली, पण सध्या चाचणी करणाऱ्या यंत्रणेवरील भार वाढल्याने अहवाल येण्यास विलंब लागत आहे. मंगळवारी दिवसभर प्रतीक्षा केली, पण अहवाल मिळाले नाहीत. आज बुधवारी ते मिळतील असे सांगण्यात आले आहे. पण ताेपर्यंत येथील प्रशासनासह मुलांचा जीव टांगणीला लागला असून अहवाल काय येईल या भीतीने घालमेल वाढली आहे.
बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मुलांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तपासणी करुन घेतली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.