‘ग्रंथालयां’चे रूपांतर ‘वाचनालया’त व्हावे
By Admin | Updated: July 6, 2015 00:32 IST2015-07-05T23:24:20+5:302015-07-06T00:32:29+5:30
इंद्रजित देशमुख : ‘लोकमत’तर्फे सहा ग्रंथालयांना ग्रंथदान

‘ग्रंथालयां’चे रूपांतर ‘वाचनालया’त व्हावे
कोल्हापूर : वाचनाने माणसाला शहाणपण येते, कारण तुमच्या जीवनाची चेतना टिकवून ठेवण्यासाठी माहिती, ज्ञान आणि स्वातंत्र्याची दृष्टी देणाऱ्या पुस्तकांनी जीवनाचे परिवर्तन होते, असं म्हणतात. ‘ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर सपाट...’, म्हणूनच समृद्ध मराठीची वाचन चळवळ रुजवायची असेल, तर असंख्य पुस्तके असलेल्या ग्रंथालयांचे रूपांतर ‘वाचनालया’त व्हायला हवे, असे मत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ने आयोजित केलेल्या शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमधील ग्रंथभेट उपक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आणि संपादक वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर शहर, ग्रामीण भागासह सांगली येथील एकूण सहा ग्रंथालयांना प्रत्येकी तीनशे या प्रमाणे १८०० पुस्तक ांचे दान करण्यात आले. यावेळी इंद्रजित देशमुख यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व आपल्या ओघवत्या वाणीने सांगत, सुरेश भट यांची ‘बोलून पाषाणाची दुनिया’ आणि बा. भ. बोरकरांची ‘तेच डोळे देखणे जे...’या कविता सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी देशमुख म्हणाले, आजच्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेत माहितीचा सागर आपल्यासमोर आहे. चमकोगिरी आणि ब्रँडेडच्या जगात आपण वावरतो; पण सत्ता, संपत्ती सौंदर्य यानंतर शाश्वत जगण्याची प्रेरणा दुसऱ्याचा आनंद शोधताना परिपूर्ण होते. शब्दांच्या सामर्थ्याने आयुष्याचे परिवर्तन होते.
ज्ञानेश्वर, तुकाराम, कुसुमाग्रजांसारख्या अनंत साहित्यिकांनी मराठी भाषेची परंपरा समृद्ध ठेवली आहे. हा वारसा असाच प्रवाहित ठेवायचा असेल, तर वाचन संस्कृतीला पर्याय नाही. ते म्हणाले, ग्रंथदान केल्याने व्यक्तीच्या जीवनाचे परिवर्तन होते. माझा ई-बुकला विरोध नाही; पण वाचनाचा खरा आनंद पुस्तकाने मिळतो.
प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, मराठी साहित्याला मिळालेला वारसा वाचन चळवळीच्या माध्यमातून जपला पाहिजे. या उद्देशाने ‘लोकमत’ने ग्रंथदान उपक्रम राबवला. यात आम्ही नागरिकांना तुम्ही वाचलेली किंवा वापरात नसलेली पुस्तके दान करा, असे आवाहन केले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. ही पुस्तके अशाच व्यक्ती, संस्था, आणि ग्रंथालयांना देण्यात येत आहेत. ज्यांनी खरंच तळागाळातील माणसांना वाचनाच्या माध्यमातून शहाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
या ग्रंथालयांना केले ‘ग्रंथदान’
कोल्हापुरातील दौलतनगर येथील स्वा. प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ वाचक) संघ, हसूर दुमाला येथील सानेगुरुजी सार्वजनिक वाचनालय, कोल्हापुरातील पाडळकर मार्केट येथील श्री देवांग कोष्टी समाज बोर्डिंग, कबनूर (ता. हातकणंगले) येथील श्री संत रोहिदास वाचनालय, (सांगली) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व मिठारवाडी (ता.पन्हाळा) येथील ज्ञानभारती या ग्रंथालयांना ग्रंथदान करण्यात आले.
आमच्या ग्रंथालयात तीन हजार पुस्तके आणि दीडशे सभासद आहेत. ‘लोकमत’ने दिलेल्या ग्रंथांमुळे आमच्या ग्रंथालयात आता दर्जेदार साहित्याची भर पडली आहे. या उपक्रमाबद्दल आम्ही ‘लोकमत’चे आभारी आहोत.
- स्नेहल पाटील,
ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सांगली