तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालये महत्त्वाची
By Admin | Updated: July 16, 2015 20:52 IST2015-07-16T20:52:40+5:302015-07-16T20:52:40+5:30
देवानंद शिंदे : साहित्यिकांना इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार

तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालये महत्त्वाची
इचलकरंजी : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून, साहित्यिकांच्या वाड्मयाने समृद्ध असलेली वाचनालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत. माणसाच्या वेदना, दु:खे आणि घुसमट साहित्यातून प्रकट झाली तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.येथील आपटे वाचन मंदिर व मराठी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्यावतीने आयोजित इंदिरा संत साहित्य कृती पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉ. शिंदे बोलत होते. साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, साहित्याचा अंतिम हेतू लोककल्याणाचा आहे. मात्र, सध्याच्या साहित्याला राजकीय व सामाजिक वातावरण काही प्रमाणात अडसर ठरत आहे.
राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्रीधर नांदेडकर (उत्कृष्ट काव्यसंग्रह), भानू काळे (उत्कृष्ट गद्य साहित्यकृती), भारत सासणे (कथासंग्रह), कृष्णात खोत (कादंबरी), मिलिंद चंपानेरकर-पुष्पा भावे (अनुवाद), म. वि. कोल्हटकर (बाल साहित्यकृती), राजीव नाईक (नाट्यसाहित्य कृती), योगेश सोमण (एकांकिका), भूषण कोरगावकर (ललित गद्य), वीरा राठोड व नीलम माणगावे (लक्षणीय काव्यसंग्रह), डॉ. दाऊद दळवी व मृणालिनी चितळे (लक्षणीय गद्य साहित्यकृती), तसेच स्थानिक साहित्यिक म्हणून रामचंद्र ढेरे आणि उत्कृष्ट वाचक यासाठी सुभाष मुनगेकर यांना सन्मानित केले.
यावेळी नवोदित लेखक प्रसाद ताम्हनकर यांच्या ‘जांभूळ पट्टी’ पुस्तकाचे राजन गवस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. काव्य व गद्य साहित्यकृती परीक्षण केल्याबद्दल किरण पाटील, बळवंत जेऊरकर व रणधीर शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. अॅड. स्वानंद कुलकर्णी व डॉ. विलास शहा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. महेश काकडे, अशोक सौंदत्तीकर, डॉ. सपना आवाडे, प्राचार्य डॉ. पी. आर. कडोले, प्रा. अशोक दास उपस्थित होते. (प्रतिनिधी)