पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात पाच फुटाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:00+5:302021-09-09T04:31:00+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी रात्रभर व बुधवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. राधानगरी धरणाचे दोन बंधारे उघडल्याने नद्यांच्या पाणीपातळीत ...

पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात पाच फुटाने वाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी रात्रभर व बुधवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. राधानगरी धरणाचे दोन बंधारे उघडल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात पाच फुटाने वाढली असून, तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीवरील ‘राजाराम’ बंधारा पाण्याखाली गेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र शाहूवाडीसह घाट माथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणातून बुधवारी सकाळी वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारी तीन वाजता राधानगरीचे दोन दरवाजे खुले झाल्याने ४२२८ घनफूट पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाण्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १७ फूट ४ इंच होती. सायंकाळी सात वाजता तब्बल २२ फूट ४ इंचावर पातळी पोहोचली होती. दिवसभरात पाच फुटाने पाणी वाढल्याने ‘राजाराम’ बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्याशिवाय ‘शिंगणापूर’,‘ सुर्वे’, ‘रुई’, ‘इचलकरंजी’ आदी तेरा बंधाऱ्यांवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आजही जोरदार पावसाची शक्यता
बुधवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. आज, गुरुवारीही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीच्या पात्रातील मंदिर पाण्याखाली जाऊ लागली आहेत. (फोटो-०८०९२०२१-कोल-रेन) (छाया- नसीर अत्तार)