घरगुती वीज बिलांच्या प्रश्नांवर तोडगा काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:22+5:302021-01-23T04:25:22+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिलाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी ...

घरगुती वीज बिलांच्या प्रश्नांवर तोडगा काढू
कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिलाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन शरद पवार यांनी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.
शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी सकाळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या रूईकर कॉलनी येथील घरी भेट दिली. यावेळी सरोज पाटील यांनी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणत हा सर्वसामान्य जनतेशी निगडित प्रश्न असल्याने तातडीने निर्णय घ्या, अशी विनंती पवार यांना केली. यावर पवार यांनीही होकार दर्शवत लवकरच ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे सांगत बिलांच्या संदर्भातील माहिती इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांच्याकडून घेतली.
किणीकर यांनी लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांच्या बिलांबाबत कोल्हापुरात एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच आंदोलने झाल्याचे सांगत मंगळवारी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी मंत्रालयात झालेल्या बैठकीचा गोषवारा सांगितला. नोव्हेबरनंतरची बिले भरण्यास जनतेची हरकत नाही, पण त्यापूर्वीची बिले आवाजवी असल्याने ती भरण्याची जनतेची ऐपत नसल्याचेही सांगितले. सहा महिन्यांच्या काळातील ही बिले माफ करावीत यासाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भडका उडेल, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यावर पवार यांनीही हा जनतेचा प्रश्न असल्याने तातडीने यात लक्ष घालून बैठक लावू, असे सांगितले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, इरिगेशन फेडरेशनचे बाबासाहेब पाटील-भुयेकर, समीर पाटील-कुंभोजकर हे उपस्थित होते.
चाैकट
स्वागत, पण त्रुटी दूर करा
कृषी पंपाच्या वीज बिलात ५० टक्के सवलत दिल्याच्या निर्णयाबद्दल पवार यांनी विचारणा केली असता या निर्णयाचे इरिगेशन फेडरेशन स्वागतच करते, पण यात काही त्रुटी आहेत, त्याची पूर्तता करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसमवेत दोन दिवसांपूर्वी बैठक झाल्याचे किणीकर यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. यातही लक्ष घालू, असे पवार यांनी सांगितले.
फोटो: २२०१२०२१-कोल-इरिगेशन
फोटो ओळ: घरगुती वीजबिलांच्या संदर्भात शुक्रवारी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विक्रांत पाटील किणीकर, समीर पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर व माई सरोज पाटील उपस्थित होत्या.