चंदगडची ‘दौलत’ पुन्हा भाड्याने देणार
By Admin | Updated: April 5, 2015 00:59 IST2015-04-05T00:58:01+5:302015-04-05T00:59:15+5:30
जिल्हा बँकेची निविदा : देणी देण्याची अट, सक्षम कंपनीची प्रतीक्षा

चंदगडची ‘दौलत’ पुन्हा भाड्याने देणार
कोल्हापूर : एकेकाळी चंदगड तालुक्यातील गोरगरीब सामान्य कष्टकरी जनतेची ‘दौलत’ असलेला दौलत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी कार्यवाही जिल्हा बॅँकेने (केडीसीसी)ने शनिवारी सुरू केली. बँकेने त्यासाठी निविदा प्रसिद्ध करून प्रस्ताव मागवले आहेत. त्यामध्ये बँकेची देणी देण्याची महत्वाची अट आहे. यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर घेऊ इच्छिणाऱ्यांना पहिल्यांदा बँकेची देणी भागवून धुराडे पेटवावे लागणार आहे.
‘दौलत’ गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांची देणी देय आहेत. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडून थकीत आहे. त्यामुळे बँकेने सिक्युरिटायझेशन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करून कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना ताब्यात घेतला. मात्र, प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण झाली होती, तीव्र विरोध झाला होता.
बँकेने सभासद, ऊस उत्पादक यांच्या हिताचा विचार करून कारखाना ‘तासगावकर शुगर्स’ला चालविण्यास देण्यास ‘ना हरकत दाखला’ दिला. मात्र, व्यवस्थापन आणि तासगावकर यांच्यात वाद निर्माण झाला. व्यवस्थापनाने बँकेचा ‘ना हरकत दाखला’ न घेता परस्पर थिटे पेपर्स कंपनीला चालविण्यास दिला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट करार केला. व्यवस्थापन आणि कंपनीने बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे बँकेला येणी वसूल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. कारखाना सक्षम कंपनीला चालविण्यास देण्यातील अडचणही दूर झाली आहे. २ एप्रिलला दौलत बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक, कामगारांच्या बैठकीत ‘दौलत’ चालविण्यास देण्यावर एकमत झाले आहे.
शनिवारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांना निवेदन दिले. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा, अशी मागणी केली. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर होसूरकर यांनीही चव्हाण यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली आहे. कारखाना चालविण्यास देण्याच्या प्र्रक्रियेला गती आली आहे.