जिल्हा बँकेसाठी फेरजुळणी करूया : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:58+5:302021-08-21T04:27:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा बँक कशा पद्धतीने चालविली आहे, याचे साक्षीदार आमदार पी. एन. पाटील आहेत. राजकारणाच्या ...

जिल्हा बँकेसाठी फेरजुळणी करूया : हसन मुश्रीफ
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा बँक कशा पद्धतीने चालविली आहे, याचे साक्षीदार आमदार पी. एन. पाटील आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेकांना मदत केल्याने बँकेने ८ हजार कोटी ठेवींचा, तर १५० कोटी नफ्याचा टप्पा पार केला. निवडणूक लढविण्यास कोणाला विरोध नाही. सतेज पाटील, पी. एन. पाटील व आघाडीचे नेते आपण सगळे एकत्र येऊन बँकेसाठी फेरजुळणी करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राजीव गांधी जयंतीनिमित्त शुक्रवारी शाहू बोर्डिंगमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकाऱ्यांमुळे राहुल पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्याचे सांगत आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गेल्या ३५ वर्षांत काँग्रेस सोडून मी काही केले नाही. सर्वच निवडणुकीत पक्ष आदेश देईल त्यांच्यासोबत राहिलो. राहुल पाटील अध्यक्ष व्हावेत, असे सामान्य माणसाला वाटत होते. त्यानुसार मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांना भेटलो.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, अध्यक्ष निवडीच्या अगोदर बेळगावमध्ये मंत्री मुश्रीफ व आपली भेट झाली, त्यावेळी तुम्ही व पी. एन. पाटील एकत्र बसून तिढा सोडवा, असे सांगितले होते. सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना अध्यक्ष, उपाध्यक्षासह सभापती निवडी होईपर्यंत कोल्हापूर सोडले नाही. राहुल पाटील हे तरुण व अभ्यासू आहेत, आपण पालकमंत्री व हसन मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री असल्याने निधीची काळजी करू नका. राहुल यांनी संधीचे सोने करत कर्तृत्व सिद्ध करावे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘पी. एन.’ हे आपल्यापेक्षा सहा महिन्याने मोठे असले तरी दोघांचा राजकीय प्रवास सारखाच आहे. कधीही दुजाभाव केला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील इतरांसाेबत जाणार असल्याच्या वावड्या उठत आहेत.
बंटी, वरना खेल खत्म...
विधानसभेच्या अगोदर , ‘बंटी , खेल खत्म करो, वरना अपना खेल खत्म होगा’ असा सल्ला सतेज पाटील यांनी दिला होता. एकसंधपणे लढल्यानेच जिल्ह्यात भाजप ‘झिरो’ राहिला. आगामी काळात भाजपला रोखायचे असेल तर आपण एकत्र राहिले पाहिजे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
शेट्टींनी थोडे थांबावे
महापुराची मदत देणार आहे. राजू शेट्टींनी थोडे थांबावे. मोर्चे, आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे. मदत मिळाली नाहीतर जरुर मोर्चे काढा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पुढची विधानसभा लढविणार
पी. एन. पाटील यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. ते किती वेळा निवडणुका लढविणार हे माहिती नाही. मात्र, आपण आणखी एक लढविणार आहे. राहुल यांचे भवितव्य चांगले आहे. कारण त्यांचा स्वभाव तडजोडीचा आहे, असे सांगत ‘करवीर’ मधून राहुल यांना पुढे करावे, असा अप्रत्यक्ष सल्ला मुश्रीफ यांनी दिला.
बिनविरोधसाठी माझा स्वार्थ
पहिल्या अडीच वर्षांतच राहुल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले असते, त्यांचे नाव मीच घेतले. यासाठी पी. एन. पाटील यांच्या घरी गेलो होतो. मला वाटले महादेवराव महाडिक काय करणार नाही, ते पाटील यांना हो म्हणतील. मात्र, जिल्ह्यातील काही शक्ती राहुल यांना होऊ द्यायच्या नाहीत यासाठी प्रयत्नशील होत्या. यामुळे त्यांना यातना झाल्या. आता राहुल भेटल्यानंतरच अध्यक्ष करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.