वाघजाई डोंगर प्रकरणाची तपासणी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:02+5:302021-09-18T04:27:02+5:30

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरातील जमीन व्यवहार व त्यासंंबंधी इतर प्रशासकीय कामकाजाची तपासणी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल ...

Let's investigate the Waghjai mountain case | वाघजाई डोंगर प्रकरणाची तपासणी करू

वाघजाई डोंगर प्रकरणाची तपासणी करू

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरातील जमीन व्यवहार व त्यासंंबंधी इतर प्रशासकीय कामकाजाची तपासणी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले. डोंगरातील जमीन धरणग्रस्तांना वाटप केल्यानंतर प्रत्यक्षात ताब्यात नसलेली जमीन पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यासंबंधी विचार करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाघजाई डोंगरावर बेकायदेशीर सपाटीकरण सुरू असल्याने कमी वेळात जास्त पाऊस पडल्यास लगतच्या १२ गावांना धोका निर्माण होऊ शकतो. यासह डोंगरावरील जमीन खरेदी-विक्री व्यवहार, स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न, आदी विविध विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली १२ गावांतील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते. ते म्हणाले, सन १९७३ मध्ये वाटप केलेली जमीन किती जणांनी प्रत्यक्षात स्वीकारली, त्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर उर्वरित जमिनीवर शर्थभंग झाल्यानंतर काय कार्यवाही झाली, त्याचीही तपासणी केली जाईल. जमीन वाटपाचे प्रकरण जुने आहे. ज्यांना वाटप केले. त्यातील अनेकजण हयातही नसतील. वाटपाचा आदेश काढणारे अधिकारीही नसतील. अशा काही अडचणी आहेत; पण डोंगरावरील जमिनीसंबंधीचे प्रकरण तपासले जाईल.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, वाघजाई डोंगराची गट नंबर ८५९ ते ८९२ पर्यंतची १७०० एकरांवर जमीन आहे. ही जमीन १९७३ मध्ये प्रकल्पग्रस्तांसह विविध घटकांना वाटप करण्यात आली; पण प्रत्यक्षात कमी लोकांनी जमिनीचा ताबा घेतला. उर्वरित जमिनीसंबंधीचे व्यवहार बेकायदेशीर, बनावट होत आहेत. यामध्ये बडे, धनदांडगे, शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. हे कवडीमोल दराने डोंगरावरील जमीन घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. बडे खरेदीदार डोंगर पोखरल्याने लगतची गावांना अती पावसात धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डोंगराचे संवर्धन होणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने झालेल्या खरेदी, विक्रीची चौकशी झाली पाहिजे.

माजी आमदार नरके म्हणाले, राजकीय दबावापोटी बोगस धरणग्रस्त, सुवर्णकार, माजी सैनिक, भूमिहिनांना वाघजाई डोंगरावरील जमिनीचे वाटप केले. यासंबंधी प्रचंड तक्रारी झाल्या आहेत. जमीन वाटपानंतर ६५ जण वगळता इतर कोणीही प्रत्यक्षात जमीन स्वीकारली नाही. यामुळे संबंधित जमीन स्थानिक शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिली. पण, सन २००० नंतर दलाल, शासकीय यंत्रणेस हाताशी धरून ताबा न दिलेल्या जमिनीची खरेदी विक्री केली. यासाठी बनावट वटमुखत्यारपत्र, कागदपत्रे तयार करून खरेदीचे व्यवहार झाले आहेत. याची सखोल चौकशी करावी.

यावेळी अरुण निंबाळकर यांनी कास पठाराप्रमाणे वाघजाई डोंगर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा, अशी मागणी केली. बैठकीस स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, भगवान पाटील, रंगराव नाईक, राजाराम पाटील, प्रकाश देसाई, आदी शेतकरी उपस्थित होते.

चौकट

‘लोकमत’ने वाचा फोडली

वाघजाई डोंगरातील जमिनीचे बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यात महसूलसह विविध विभागाचे अधिकारी, दलाल यांचा समावेश आहे. यात मोठे रॅकेट निर्माण झाले आहे, असा आरोप माजी आमदार नरके यांनी केला. यासंबंधी ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने डोंगरालगतचे ग्रामस्थ सतर्क झाल्याचेही त्यांनी सांगितले.

धनदांडग्यांनी जमिनी लाटल्या

वाघजाई डोंगरातील शेकडो एकर जमीन धनदांडग्यांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून लाटली आहे. ते आता जबरस्तीने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमीन काढून घेत आहेत. नियमबाह्यपणे सपाटीकरणामुळे डोंगरालगतच्या गावांना धोका निर्माण झाला म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.

फोटो : १७०९२०२१-कोल- वाघजाई मिटींग

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समोर वाघजाई डोंगरावरील जमिनीसंबंधी झालेल्या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह १२ गावांतील ग्रामस्थ प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

Web Title: Let's investigate the Waghjai mountain case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.