चला मैदानाकडे वळू...रोगप्रतिकार शक्ती वाढवू...कोरोनाला हरवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:23+5:302021-09-08T04:31:23+5:30
वर्षभरातील उपक्रमांचा प्रारंभ गणेशोत्सवापासून सुरू करण्याची मंडळाची प्रथा आहे. याचे औचित्य साधून या गणेशोत्सवात ‘क्रीडा गणेश’ संकल्पना राबवण्याचा निर्णय ...

चला मैदानाकडे वळू...रोगप्रतिकार शक्ती वाढवू...कोरोनाला हरवू
वर्षभरातील उपक्रमांचा प्रारंभ गणेशोत्सवापासून सुरू करण्याची मंडळाची प्रथा आहे. याचे औचित्य साधून या गणेशोत्सवात ‘क्रीडा गणेश’ संकल्पना राबवण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. विविध मैदानी खेळाच्या साहित्यातून साकारलेली गणेशमूर्ती ‘चला मैदानाकडे वळू...रोगप्रतिकार शक्ती वाढवू...कोरोनाला हरवू’ हा सुदृढ आरोग्याचा मंत्र देणार आहे.
गणेशोत्सव हे हमखास प्रबोधनाचे साधन असल्याने याच माध्यमातून कोरोना प्रतिबंधक संदेश दिला जाणार आहे. या वर्षातील उपक्रमसुद्धा ‘निर्मिती’च्या आजवरच्या लौकिकास पात्र ठरणारा आहे. हे वर्ष ‘सुदृढ शरीर - तंदुरुस्त मन’ म्हणून साजरे करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे. गेली दोन वर्षे सर्व जण कोरोना महामारीचा सामना करत आहेत. जोपर्यंत ही महामारी कायमची हद्दपार होत नाही, तोपर्यंत कोरोनासोबतच जगण्याची सर्वांची मनस्थिती आहे. कोरोनाला हरवायचे म्हणजेच ‘इम्युनिटी’ वाढवावी लागेल. त्यासाठी मैदानाकडे वळावेच लागेल. नेमका हाच संदेश या गणेशोत्सवात ‘निर्मिती’चा क्रीडा गणेश देणार आहे. या वेळी सचिव चंद्रशेखर आमनगी, विजय पाकले, उमेश पोकळे, डॉ. प्रकाश तौकरी, सुयोग आमनगी, शिवप्रसाद आमनगी, राजेंद्र देशमाने, महांतेश साखरे, सुहास तौकरी, मंदार हळवणकर, शिरीष ठाकूर आदी उपस्थित होते.
चाैकट :
बाप्पा देणार खेळाडूंना बळ
इतका मोठा आपला देश असूनही ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुष्काळ असतो. म्हणूनच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या युवा पिढीला मैदानाकडे वळण्याचा संदेश ‘निर्मितीचा क्रीडा गणेश’ देणार आहे. विविध खेळ साहित्यांपासून ‘क्रीडा गणेशा’ साकारला जाणार आहे. उत्सवानंतर या गणेशाचं प्रतीकात्मक विसर्जन करून हे सर्व साहित्य खेळाडूंना मोफत दिले जाणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
महादेव मिसाळ : ०७०९२०२१-गड-०७
किरण आमणगी : ०७०९२०२१-गड-०८