विधानसभा स्वबळावर लढवूया
By Admin | Updated: July 3, 2014 01:02 IST2014-07-03T01:01:05+5:302014-07-03T01:02:02+5:30
पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

विधानसभा स्वबळावर लढवूया
कोल्हापूर : जिल्ह्णात काँग्रेसचे अस्तित्व राखायचे असेल तर आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढूया, कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तसा निर्णय घ्यावा, अशा भावना आज दुपारी काँग्रेस कार्यालयात झालेल्या विविध सेलच्या अध्यक्षांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या नलिनी चंदेले यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक पार पडली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजकीय वातावरण काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत तसेच पुढच्या काळात कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, याची पाहणी करून तसा अहवाल प्रदेश कार्यालयास सादर करण्याकरीता चंदेले यांना कोल्हापूरला पाठविण्यात आले होते.
चंदेले या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी आज दुपारी काँग्रेस कार्यालयात सर्व सेलच्या अध्यक्षांशी चर्चा करून त्यांचे मनोगत जाणून घेतले.
शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो तर चांगले यश मिळेल, असा आशावाद चव्हाण यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी महामंडळ, समित्यांची नियुक्त कराव्यात, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निवडी कराव्यात, असेही त्यांनी सुचविले. गुलाबराव घोरपडे यांनीही आपली मते मांडली.
निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस सरकारने केलेल्या विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन चंदेले यांनी केले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी सभापती सचिन चव्हाण, चंद्रकांत घाटगे, नगरसेविका सरस्वती पोवार, लीला धुमाळ, संध्या घोटणे, दीपा पाटील, नाईकवडी, उदय चव्हाण, सदाशिवराव जरग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)