प्रतीकांसाठी कोल्हापूर बंद करू
By Admin | Updated: September 1, 2015 23:54 IST2015-09-01T23:54:50+5:302015-09-01T23:54:50+5:30
मराठा महासंघ महिला आघाडी : अंबाबाईला नाग, सिंह प्रतीकांसाठी साकडे

प्रतीकांसाठी कोल्हापूर बंद करू
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवर नाग आणि सिंहाची योग्य प्रतीके घडविण्यात यावीत, यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीतर्फे मंगळवारी अंबाबाईच्या चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी ‘उदे गं अंबाबाई’, ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला. नाग आणि सिंह ही प्रतीके लवकर घडविली नाहीत, तर ‘कोल्हापूर बंद’ पुकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सकाळी साडेअकराच्या सुमारास भवानी मंडप येथे जमल्या. अंबाबाईच्या मूर्तीवर नाग व सिंहाची प्रतीके घडविण्यात चूक झाल्यामुळे या रणरागिणींनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी अंबाबाईच्या जयघोषाच्या घोषणा देत या महिलांनी दक्षिणद्वाराकडून मंदिरात प्रवेश करीत देवीचे दर्शन घेतले. सत्याला सत्य म्हणण्याची ताकद दे, महाराष्ट्रावरील दुष्काळावर मात कर, तुझ्या चरणी महिलांना सन्मानपूर्वक स्थान दे, असे साकडे महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाईच्या चरणी घातले. यावेळी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले म्हणाल्या, अंबाबाई देवीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान गंभीर चुका झाल्या आहेत. मूर्तीवर नाग आणि सिंहाची प्रतीके घडविलेली नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मूर्तीवरील ही प्रतीके त्वरित घडविण्यात यावीत; अन्यथा आम्ही ‘कोल्हापूर बंद’ची हाक देऊ. दीप्ती सासने म्हणाल्या, प्रतीके लवकर न घडविल्यास महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पुजाऱ्यांना देवळात प्रवेश करू देणार नाहीत.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, अंबाबाई ही अंबाबाईच राहिली पाहिजे. तिच्या मूर्तीवर नाग आणि सिंह प्रतीके घडविण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अंबाबाईला ‘महालक्ष्मी’ करण्याचा डाव काहीजण आखत आहेत. तो महासंघ उधळून लावील.
यावेळी रुक्मिणी शिंदे, दीपा डोणे, विद्या साळोखे, संगीता घोरपडे, उषा लांडे, संगीता राणे, भारती रसाळ, नीता पाटील-सरुडकर, माधुरी अर्जुनीकर, माया मिसाळ यांच्यासह सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या.