कोल्हापूर : रयत अडचणीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी धावून जाऊन मदत केली. त्यांच्या आचार-विचारांचे आपण वारसदार आहोत, त्यांच्या जयंतीनिमित्त दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी तरुण मंडळांनी पुढे यावे, असे आवाहन कुंभी-कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. सांगरूळ (ता. करवीर) येथील शिवछत्रपती जाणता राजा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना ‘मराठा पुरस्कार’ देऊन आमदार नरके यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. समाजाला दिशा देणाऱ्या व कार्यकर्तृत्वाने आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर थाप देण्याचे काम जाणता राजा प्रतिष्ठानने केल्याचे गौरवोद्गारही आमदार नरके यांनी काढले. ‘लोकमत’चे बातमीदार प्रकाश पाटील (कोपार्डे) यांना ‘पत्रकाररत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. योगेश नाळे यांना ‘सांगरूळ भूषण’, ‘कोजिमाशि’चे उपाध्यक्ष के. एस. खाडे यांना ‘शिक्षणरत्न’, युवराज चौगले यांना ‘क्रीडारत्न’, स्वामी समर्थ टाईल्स यांना ‘उद्योगरत्न’, महेश नाळे, संदीप पाटील व सुशांत भास्कर यांना ‘प्रेरणारत्न’, आझाद नायकवडी यांना ‘कलारत्न’ व उन्मेद फौंडेशन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.प्रतिष्ठानचे सदस्य सोनू स्हन्नके यांनी स्वागत केले. प्रतिष्ठानचे संस्थापक व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संभाजी नाळे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. आमदार नरके यांच्या निधीतून बाजारपेठ येथे बसविण्यात येणाऱ्या एल.ई.डी. हायमास्ट पोल कामाचा प्रारंभ उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संभाजी नाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘कुंभी’चे उपाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, ‘कुंभी’चे संचालक निवास वातकर, प्रकाश मुगडे, संभाजी पाटील, सुधीर खाडे, बंकट थोडगे, सदाशिव खाडे, भरत खाडे, सरदार खाडे, अनिल घराळ, उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्तात्रय बोळावे यांनी केले.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण मंडळांनी पुढे यावे
By admin | Updated: May 10, 2016 02:34 IST