Let us forget Congress and raise the Congress | झालं गेलं विसरून कॉँग्रेसला उभारी देऊ
झालं गेलं विसरून कॉँग्रेसला उभारी देऊ

कोल्हापूर : गेली १४ वर्षे कॉँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून काम करीत असताना जिल्ह्यात कॉँग्रेस बळकट करण्याचा प्रयत्न केला. सध्या अडचणीचा काळ आहे. मोजके मावळे असले तरी गड जिंकूच, असा विश्वास काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. मागे काय झाले ते सगळे आपण विसरून जाणार आहोत आणि सगळ््यांना बरोबर घेऊन काँग्रेसला उभारी देण्यास आपले प्राधान्य राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. कॉँग्रेसमध्ये आता आत-बाहेर चालणार नाही. राहायचे असेल त्यांनी ताकदीने राहा, असा इशाराही पाटील यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी आमदार पाटील यांनी कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात प्रवेश केला. महापुरामुळे फटाके, हारतुऱ्यांचा डामडौल नव्हता, परंतु कार्यकर्त्यांची तोबा गर्दी होती. काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण दिसले.
आमदार पाटील म्हणाले, गेल्या १०-१५ वर्षे सर्व तालुक्यांत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद दिली; पण त्याचा गाजावाजा केला नाही. मध्यंतरीच्या घडामोडीनंतर ज्येष्ठ नेते म्हणून जिल्हाध्यक्षपदासाठी जयवंतराव आवळे यांच्या नावाची शिफारस केली होती; पण पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिली. पक्ष बदलण्याचा निर्णय घेणाऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे. पक्षाने आपणाला काय दिले आणि आपली बांधीलकी काय? पक्षाने मंत्री केले. आता अडचणीच्या काळात मागे राहणे योग्य होणार नाही. पक्षातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणांंचे सहकार्य घेऊन जिल्ह्णात कॉँग्रेस ‘नंबर वन’ करू.
भाजप सरकारवर सडकून टीका करताना पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाºयांनी त्यांच्या गडकिल्ल्यांवर हॉटेल उभारण्याचा संकल्प केला आहे, त्याचा निषेध करतो. ज्या किल्ल्यांच्या इतिहासातून शिवरायांच्या प्रतापाची महिती तरुण पिढीसमोर जाणार आहे, तेच किल्ले हॉटेलसाठी भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. या भूमिकेमागे षड्यंत्र असून या निमित्ताने छत्रपतींचा विचार पुसण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. ते आम्ही कदापि होवू देणार नाही.’
नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी स्वागत केले. अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, हिंदुराव चौगले, सरलाताई पाटील, शशांक बावचकर यांनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भूपाल शेटे, संजीवनीदेवी गायकवाड, ऋतुराज पाटील, राजू आवळे, यशवंत हाप्पे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, दौलत देसाई, अमर यशवंत पाटील, विजयसिंह मोरे, राहुल खंजिरे, जयराम पाटील, उदयानी साळुंखे, संध्या घोटणे, सुप्रिया साळोखे, आदी उपस्थित होते.

काँग्रेस कमिटीत
राजेश नरसिंग पाटील
‘गोकुळ’चे संचालक राजेश नरसिंग पाटील हे बुधवारी कॉँग्रेस कमिटीत हजर झाल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या.भरमू पाटील हे भाजपमध्ये गेल्याने तालुक्यात कॉँग्रेस कमकुवत झाली होती. अशातच पाटील यांनी उपस्थिती लावत धक्का दिला.

इचलकरंजीत कॉँग्रेसचाच आमदार
इचलकरंजीतील नेते सोडून गेले असले तरी सामान्य जनता कॉँग्रेससोबत आहे. इचलकरंजीचा आमदार हा कॉँग्रेसचाच असेल. कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. नेत्यांचेच काही सांगता येत नाही, असा टोला शशांक बावचकर यांनी लगावला.


Web Title: Let us forget Congress and raise the Congress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.