नव्या संशोधनाकडे प्र्राध्यापक, शिक्षकांची पाठ : कोतापल्ले
By Admin | Updated: December 9, 2014 23:53 IST2014-12-09T23:44:15+5:302014-12-09T23:53:34+5:30
सांगलीत कार्यक्रम : अण्णासाहेब लठ्ठे जयंतीनिमित्त स्नेहमेळावा

नव्या संशोधनाकडे प्र्राध्यापक, शिक्षकांची पाठ : कोतापल्ले
सांगली : आपल्याकडे शिकविण्यात येणारा अभ्यासक्रम हा मागासलेला असून, तो बदलण्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांचाच विरोध होत आहे. नवीन संशोधन, सिध्दांत, अभ्यासाकडे त्यांचे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली.
येथील नेमिनाथनगरातील नेमिनाथ भवनमध्ये आज (मंगळवार) अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जयंतीनिमित्त सेवक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहमेळाव्यात आदर्श सेवकांंना डॉ. कोतापल्ले यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे होते. लठ्ठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अॅड. विजयकुमार सकळे आदी उपस्थित होते.
कोतापल्ले म्हणाले की, जगभरात ज्ञानाचा स्फोट झाला असताना, आपण मात्र त्या प्रवाहात नाही. मागास शिक्षण पध्दतीमध्येच आपण रुतलो आहोत. यामध्ये बदल करायचा म्हटले, तर शिक्षक, प्राध्यापकांकडूनच याला विरोध होत आहे. नव्या संशोधनासाठी चांगला पगार दिला जात असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. केवळ गलेलठ्ठ पगार इतर क्षेत्रात गुंतवणुकीसाठीच वेळ आणि विचार खर्च होत आहे. त्यामुळे चांगला पगार देण्याचे उद्दिष्टच बाजूला रहात आहे. विद्यापीठे पदवी देणारे कारखाने बनत आहेत. माणसातील माणूसपण जागे करणाऱ्या शिक्षणाची आज गरज आहे. याकडे आता गांभीर्याने पाहण्याची नितांत गरज आहे.
यावेळी जी. ए. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत कोडग, प्रभारी प्राचार्य गुंडूराव वसवाडे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक मुसा तांबोळी, शिपाई मल्लू हणमंत कोरव आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्वागत सुरेश पाटील यांनी केले. आभार बाळासाहेब मासुले यांनी मानले. सूत्रसंचालन सोनाली पाटील, एन. डी. बिरनाळे यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. (प्रतिनिधी)