राबणाऱ्या हातांना कौशल्याचे धडे !

By Admin | Updated: December 31, 2014 23:58 IST2014-12-31T23:28:07+5:302014-12-31T23:58:33+5:30

नववर्षातील उपक्रम : इंजिनिअरिंग असोसिएशन करणार अद्ययावत ‘कॅडकॅम’ सेंटरची उभारणी

Lessons of the hands of the master! | राबणाऱ्या हातांना कौशल्याचे धडे !

राबणाऱ्या हातांना कौशल्याचे धडे !

संतोष मिठारी - कोल्हापूर -वेळ आणि पैशांची बचत करणारे ‘अ‍ॅटोमेशन’ उद्योगांसाठी गरजेचे बनले आहे. ते लक्षात घेऊन वाहने, यंत्रांच्या सुट्या भागांची उत्पादनापूर्वी रचना संगणकाद्वारे करण्याचा ‘ट्रेंड’ उद्योगांमध्ये वेगाने रूजत आहे. त्यामुळे उद्योजक-व्यावसायिकांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ घडविण्याचे काम कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (केईए) करणार आहे. त्यासाठी असोसिएशनच्या इमारतीत अद्ययावत अशा कॅडकॅम ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतींमध्ये राबणाऱ्या हातांना नववर्षात बदलत्या कौशल्याचे धडे मिळणार आहेत.
वाहन उद्योगांचा व्याप वाढल्याने जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला आपल्या उत्पादन प्रक्रियेत बदल करावा लागत आहे. उद्योगांमध्ये कॉम्प्युटर अ‍ॅडेड डिझायनिंग (कॅड)द्वारे नवनवीन यंत्रांची रचना करणे. उत्पादन प्रक्रियेत कॉम्प्युटर अ‍ॅडेड मॅन्युफॅक्चरिंगचा (कॅम) वापर वाढत आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या कुशल मनुष्यबळाची उद्योजकांना कमतरता भासत आहे. त्यावर अशा स्वरूपातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याचा निर्णय ‘केईए’ने दीड वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार फौंड्री क्लस्टरअंतर्गत अद्ययावत कॅडकॅम ट्रेनिंग सेंटरच्या उभारणीचे काम सुरू केले. सध्या सेंटर तयार झाले आहे. शिवाजी उद्यमनगरातील ‘केईए’च्या इमारतीवर हे सेंटर साकारले आहे. त्याचे बांधकाम, कॉम्प्युटर, कॅडकॅमची सॉफ्टवेअर आदी सुविधांसाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. याठिकाणी कॅडकॅम ट्रेनिंग सेंटर आणि कॅडकॅड सेंटर असे स्वतंत्र विभाग आहेत. त्यातील ट्रेनिंग सेंटरद्वारे अ‍ॅटोकॅड आदींचे प्रशिक्षण दिले जाईल. कॅडकॅम सेंटरमधून मोठे प्लॉटरची खरेदी, त्यांच्या सुट्या भागांचे थ्रीडी मॉडेलची निर्मिती, फोटो प्रिंटिंग, ड्रॉर्इंग अ‍ॅण्ड ड्राफ्टींग, इंटरनेट, वायरस रिमूव्हिंग टूल्स्, ट्रबल शूटिंग, कॉम्प्युटर एएमसी, आॅनलाईन लिस्टिंग, डाटा रिकव्हरी अशा सुविधा उद्योजकांना पुरविण्यात येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ट्रेनिंग सेंटर सुरू होईल. ‘केईए’चा सेंटरबाबतचा उपक्रम उद्योगांच्या विकासाला गती देणारा आहे.


काम, शिक्षण सांभाळून प्रशिक्षण
सेंटरमधून प्रशिक्षणासाठी दोन ते तीन महिन्यांचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे. दररोज दोन तासांच्या चार बॅचेस होतील. एका बॅचमध्ये सहाजण असतील. त्यांना प्रॅक्टिकल आणि थेअरी स्वरूपात मार्गदर्शन केले जाईल. त्यांच्याकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. हायर डाटा स्टोरेज्ची सुविधा, टू डी (डायमेशन)पासून थ्री-डीची निर्मिती, अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून सुट्या भागांची निर्मिती, डाटा मायग्रेशन, डिझायनिंग डेव्हलपमेंट, गेजेस्, फिक्चर्स, डाय व शीटमेटलबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेंटरमध्ये कामगारांना आपल्या कामाची वेळ आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची वेळ सांभाळून प्रशिक्षण घेता येणार आहे.



उद्योजकांची गरज लक्षात घेऊनच या सेंटरची निर्मिती केली आहे. त्यातून कुशल वर्कफोर्स देण्याचा प्रयत्न असोसिएशनने केला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सेंटर सुरू केले जाईल. प्रारंभी असोसिएशनचे संचालक, काही सभासदांनी आपल्या कंपनी, कारखान्यांमधील कामगारांच्या प्रशिक्षणाचा भार उचलला आहे. सध्या २४ जणांची नोंदणी झाली आहे. कामगारांच्या प्रशिक्षण शुल्कासाठी उद्योजकांकडून प्रायोजकत्व घेतले जाणार आहे. टप्प्या-टप्याने सेंटरची व्याप्ती वाढविणार आहे.
- रवींद्र तेंडुलकर
(अध्यक्ष, केईए)

Web Title: Lessons of the hands of the master!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.