बसचालकांना डिझेल बचतीचे धडे
By Admin | Updated: November 21, 2014 00:31 IST2014-11-20T20:57:59+5:302014-11-21T00:31:17+5:30
‘सिम्युलेटर मशीन’वर प्रात्यक्षिक : जिल्ह्यातील प्रत्येक आगारात प्रशिक्षण

बसचालकांना डिझेल बचतीचे धडे
राम मगदूम - गडहिंग्लज --महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रत्येक बसचालकाला डिझेल बचतीचे धडे दिले जात आहेत. प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न आणि त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च याचे गणित त्यांना समजावून सांगण्यात येत आहे. त्यासाठी कोल्हापूर विभागीय कार्यशाळेत खास मशीन बनविण्यात आले आहे. त्या मशीनचे नाव आहे ‘सिम्युलेटर मशीन’
‘सिम्युलेटर मशीन’ हाताळण्याचे प्रशिक्षण सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारात हे मशीन बसवून चालकांना डिझेल बचतीचा मंत्र दिला जात आहे. सध्या गडहिंग्लज आगारात बसचालकांचे प्रशिक्षण सुरू आहे.
सुरक्षित प्रवासासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांची वेगमर्यादा ७०, तर जवळच्या अंतराच्या गाड्यांची वेगमर्यादा ६५ ला लॉक करण्यात आली आहे. मात्र, डिझेलच्या वापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. त्यामुळेच या मशीनद्वारे चालकांना प्रशिक्षित केले जात आहे. डिझेल बचतीसाठी गाडी एकाच गतीने चालवा, थांब्यावर जादावेळ थांबणार असला तर गाडी बंद करा, गिअर बदलताना डबल क्लचचा वापर करा, थांबा येण्यापूर्वी हळूहळू गती कमी करून गाडी थांबवा, एकदम गाडी थांबवू नका, अशा सूचना दिल्या जात आहेत. किती स्पीडला किती डिझेल लागते यासंबंधीची माहिती या मशीनवर प्रत्यक्ष कृतीद्वारे दिली जात आहे. कोल्हापूर, संभाजीनगर, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कागल, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, इचलकरंजी व कुरुंदवाड या आगाराकडील सर्व चालकांच्या प्रशिक्षणासाठी हे मशीन टप्प्याटप्प्याने पाठविले जात आहे.
सावधान..अभिनंदन..!
डिझेलच्या योग्य वापरासाठी लांब पल्ल्याच्या प्रवासात एका लिटरमध्ये ५ कि. मी., तर जवळच्या अंतराच्या प्रवासात एका लिटरमध्ये ४.८० कि. मी. अॅव्हरेज अपेक्षित आहे.
याचे पालन करणाऱ्या चालकांची नावे सूचना फलकावर लिहून ‘अभिनंदन’ करण्यात येते. अपेक्षेपेक्षा अॅव्हरेज कमी असणाऱ्या चालकांची नावेदेखील त्याच फलकावर लिहून ‘सावधान’तेचा इशारा दिला जात आहे.
या प्रशिक्षणामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असून सर्व चालक उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण घेत आहेत.
गडहिंग्लज आगारात डिझेल बचतीचे प्रशिक्षण घेताना बसचालक .