विहिरीत पडून बिबट्या मृत

By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-22T23:46:34+5:302015-02-23T00:16:56+5:30

आंगवलीतील घटना : ग्रामस्थ, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पहाटे काढले बाहेर

Leopard dead after lying in well | विहिरीत पडून बिबट्या मृत

विहिरीत पडून बिबट्या मृत

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली-सोनारवाडीतील दगडू खाचे यांच्या शेतविहिरीत शनिवारी सायंकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मृत बिबट्याला विहिरीबाहेर काढले.गावातील दगडू खाचे यांची ‘हेलयत’ याठिकाणी शेतविहीर आहे. या ठिकाणी त्यांची कलमाची बाग आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान दगडू खाचे यांची मुलगी रशिदा या कलमांना पाणी घालण्यासाठी विहिरीत पाणी आणण्याकरिता गेल्या असता त्यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळून आला. ही माहिती त्यांनी आपल्या वडिलांना सांगितली. वनविभागाचे वनपाल तुकाराम यादव, वनरक्षक धुळू कोळेकर, दीपक आरेकर, आदीही घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्याला विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. विहीर तब्बल ४० फूट खोल असल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आल्या. अखेर पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले. हा बिबट्या मादी जातीचा असून, दीड वर्षाचा आहे. तो भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला असावा व विहिरीत पडल्यानंतर आपटून तो मृत झाला असल्याचा अंदाज वनपाल तुकाराम यादव यांनी वर्तवला आहे. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी संजय अणेराव, संतोष अणेराव, दिनेश कांबळे, अरुण मांडवकर, संतोष कांबळे हेही उपस्थित होते. (वार्ताहर)


शवविच्छेदनाच्या विलंबावरुन तीव्र नाराजी
बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. टी. शिवगण हे उशिरा आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी शिवगण यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवारी सायंकाळी ९.३० च्या दरम्यान शिवगण यांनी मृत बिबट्याचे विच्छेदन केल्यानंतर परिक्षेत्र वनपाल अशोक लाड, संगमेश्वरचे वनपाल तुकाराम यादव, वनरक्षक धुळू कोळेकर, दीपक आरेकर, पोलीसपाटील संतोष अणेराव, अब्दुल बोवडे, नायब तहसीलदार संजय दाभोळकर यांच्या उपस्थितीत या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Leopard dead after lying in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.