विधान परिषदेचे पडसाद उमटणार

By Admin | Updated: June 6, 2016 00:47 IST2016-06-06T00:23:59+5:302016-06-06T00:47:21+5:30

- जयसिंगपूर नगरपालिका रणांगण

The Legislative Council will get the results | विधान परिषदेचे पडसाद उमटणार

विधान परिषदेचे पडसाद उमटणार

संदीप बावचे-- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्याच्या राजकीय कुरुक्षेत्रात जयसिंगपूर शहराचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे़ बदलत्या राजकीय परिस्थितीत जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे़ येथील नगरपालिकेची निवडणूक आतापर्यंत पक्षीय पातळीवर न होता गटातटाच्या राजकारणातच झाली आहे़ गटाअंतर्गत झालेल्या या निवडणुकीत यड्रावकर गटाने बाजी मारली आहे़ नगरपालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून यड्रावकर गटाची सत्ता अबाधित आहे़ होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीची छाप पडण्याची शक्यता राजकीय वातावरणात व्यक्त होत आहे़ नगरपालिका निवडणुकीत प्रत्यक्षात येथे कोणता पॅटर्न राबविला जाईल, याबाबत संभ्रमावस्था आहे़
गतवेळच्या सन २०११ मध्ये झालेल्या निवडणुकीत यड्रावकर व सा़ ऱे पाटील गटाच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी बाजी मारली़ खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीला खातेही उघडता आले नाही़ सत्तेची सूत्रे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाच्या हाती जाणार हे स्पष्ट होताच जनसुराज्य पक्षाच्या एका सदस्याने व अपक्षाने सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केली़ त्यामुळे पालिकेवर गेली पाच वर्षे यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची एकहाती सत्ता राहिली़
राज्यातील भाजप आघाडी सरकारने होऊ घातलेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे़ जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी पडते़ यावर येथील निवडणुकीची चुरस अवलंबून राहणार आहे़
गेल्या पाच वर्षांत येथील नगरपालिकेवर यड्रावकर व सा़ रे़ पाटील गटाची सत्ता राहिली़ मात्र, सा़ रे़ पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाची सूत्रे दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील व शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिलराव यादव यांच्या हाती राहिली आहे़ यड्रावकर गटाशी ते मिळते-जुळते घेणार की, आपला वेगळा सवतासुभा निर्माण करणार यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे़ त्याचबरोबर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीला हादरा देत पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार झालेले उल्हास पाटील कोणती भूमिका घेतात, हेही तितकेच महत्त्वाचे आहे़ खासदार राजू शेट्टी या निवडणुकीसाठी कशा पद्धतीने मोट बांधतात, हेही महत्त्वाचे आहे़
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते डॉ़ राजेंद्र पाटील-यड्रावकर हे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहिले़ त्यामुळे यड्रावकर विरोधक विधान परिषदेतील पराभूत उमेदवार महादेवराव महाडिक यांना या निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न करीत आहेत़ खा़ राजू शेट्टी, महादेवराव महाडिक, आमदार उल्हास पाटील अशी शक्ती एकवटल्यास ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे़

Web Title: The Legislative Council will get the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.