महापालिका वगळूनच होणार विधान परिषद निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:40+5:302021-09-14T04:29:40+5:30
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे प्रतिनिधित्व करत असलेल्या विधान परिषदेची निवडणूक महापालिकेतील सदस्यांना वगळूनच आता होणार आहे. कारण ...

महापालिका वगळूनच होणार विधान परिषद निवडणूक
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे प्रतिनिधित्व करत असलेल्या विधान परिषदेची निवडणूक महापालिकेतील सदस्यांना वगळूनच आता होणार आहे. कारण विधान परिषदेची मुदत १ जानेवारी २०२२ ला संपत आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर किमान ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते. तोपर्यंत कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने हा ८१ मतांचा कोटा वगळूनच विधान परिषदेची लढत होणार आहे.
गेल्या वेळेला ही निवडणूक २७ डिसेंबर २०१५ ला झाली होती व त्याचा निकाल ३० डिसेंबरला लागला होता. त्या लढतीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार व तत्कालीन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी पराभव केला होता. सतेज पाटील यांना २२० तर महाडिक यांना १५७ मते मिळाली. पाच मते बाद ठरली. एकूण ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विजयासाठी १९० मतांचा कोटा आवश्यक होता. या वेळेला महापालिकेची मते कमी झाली तरी नगरपरिषदेचे मतदान वाढले आहे.
ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत होते. त्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जात असताना कोणत्या महापालिकेची निवडणूक झाली आणि कोणत्या नाही हे पाहिले जात नाही. मतदार यादी तयार करताना एका विशिष्ट तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य या निवडणुकीस पात्र असतील त्यांची मतदार यादी अंतिम करून निवडणूक घेतली जाते. तशीच प्रक्रिया या वेळेला होणार आहे. कोल्हापूर महापालिकेत एकूण ८१ सदस्य असून, त्यांची मुदत संपल्यामुळे त्यांना निवडणुकीत भाग घेता येणार नाही. महापालिकेत काँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे १४ आणि शिवसेनेचे ४ असे ४७ मतदारांचा गठ्ठा पालकमंत्री पाटील यांच्या पाठीशी होता. ही मते वगळूनच त्यांना आता या निवडणुकीचे गणित मांडावे लागणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांनाही महापालिकेतील मतांचे मोठे पाठबळ असे. तेथील किमान ५० मते घेऊनच त्यांच्या विजयाची सुरुवात होई. हाच फॉर्म्युला पालकमंत्री पाटील यांनी गेल्या निवडणुकीत वापरला. त्यासाठी महापालिका निवडणूकही प्रचंड ईर्षेने लढवली व त्याचा त्यांना या निवडणुकीसाठी नक्कीच फायदा झाला होता.
महाविकास आघाडीचे पाठबळ
आता गेल्या सहा वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचेही चिन्हांवर निवडून आलेले
सदस्य त्यांच्या पाठीशी असतील. गेल्या निवडणुकीत सत्ता नसतानाही त्यांनी स्वत:च्या ताकदीवर ती जिंकली होती. या निवडणुकीत त्यांना सत्तेचे मोठे पाठबळ असेल. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासह ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी अनेक छोट्या-मोठ्या गटांना विविध प्रकारची राजकीय मदत केली आहे.
विरोधात कोण याबद्दल उत्सुकता..
जिल्हा परिषदेसह नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये भाजपच्या चिन्हांवर निवडून आलेल्या सदस्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे भाजपचा किंवा भाजप पुरस्कृत उमेदवार निवडणुकीत नक्की असेल. संभाव्य उमेदवारांमध्ये महाडिक कुटुंबीयांतून एखादा सदस्य रिंगणात असू शकतो. यापूर्वी महादेवराव महाडिक यांच्याविरोधात लढलेले प्रा.जयंत पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. पालकमंत्री पाटील यांना या मतदार संघातील विजय सहजासहजी मिळू द्यायचा नाही, अशी मोर्चेबांधणी भाजपकडून नक्कीच केली जाऊ शकते.